वृत्तसंस्था/ रॉटरडॅम (हॉलंड)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग महिला हॉकी स्पर्धेत मंगळवारी येथे भारत आणि अमेरिका यांच्यात सामना खेळविला जाणार आहे. महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेला आता केवळ दहा दिवस बाकी राहिले असून भारतीय महिला हॉकी संघाला सरावाची ही शेवटची संधी आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग महिलांच्या हॉकी स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होताना भारतीय महिला हॉकी संघाने आतापर्यंत दर्जेदार कामगिरी करताना 14 सामन्यांतून 24 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. अर्जेंटिनाने यापूर्वी या स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केला असून त्यांनी 16 सामन्यांतून 42 गुणांसह पहिले स्थान तर हॉलंडने 14 सामन्यांतून 32 गुणांसह दुसरे स्थान पटकाविले आहे. बेल्जियम संघाने 14 सामन्यांतून 22 गुणांसह चौथे स्थान घेतले आहे. भारत आणि अमेरिका महिला हॉकी संघामध्ये मंगळवारी येथे पहिला सामना होणार आहे. उभय संघांमध्ये दोन सामने खेळविले जाणार आहेत. दुसरा सामना येत्या बुधवारी खेळविला जाईल.
गेल्या आठवडय़ात या स्पर्धेत भारताला ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या अर्जेंटिनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला होता. भारतीय महिला संघाने दुसऱया सामन्यांत पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला होता. सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ अमेरिका संघावर विजय मिळवून या स्पर्धेतील आपले तिसरे स्थान कायम राखण्याचा प्रयत्न करेल. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाला आगामी विश्वचषक महिलांच्या हॉकी स्पर्धेसाठी अधिक आत्मविश्वास मिळेल. ही स्पर्धा हॉलंड आणि स्पेन यांच्या संयुक्त यजमानपदाने 1 जुलैपासून सुरू होणार आहे.
प्रो लीग महिलांच्या हॉकी स्पर्धेत गुणतक्त्यात अमेरिका शेवटच्या स्थानावर आहे. त्यांनी 12 सामन्यांतून केवळ 5 गुण मिळविले आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना 3 जुलैला इंग्लंडविरूद्ध होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा ब गटात समावेश असून इंग्लंड, चीन आणि न्यूझीलंड हे संघ या गटात आहेत.