आयपीएल साखळी फेरीत आज चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध लढत
वृत्तसंस्था / नवी मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे दिल्ली कॅपिटल्स आणि माजी विजेत्या चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता येथील डी.वाय.पाटील स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ सलामी जोडीची समस्या सोडविण्यावर आपले लक्ष केंद्रित करीत आहे.
दहा संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत विद्यमान विजेत्या चेन्नई सुपरकिंग्सचे प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्याचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे तर दिल्ली कॅपिटल्सने दहा सामन्यांतून 10 गुण नोंदविले आहेत. दिल्ली संघाने यापूर्वीच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्स दहा सामन्यांतून सहा गुणांसह गुणतक्त्यात नवव्या स्थानी फेकला गेला आहे. या स्पर्धेतील चेन्नई संघाचे उर्वरित सामने औपचारिक राहतील.
दिल्ली संघाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरची फलंदाजी बहरत आहे. पण सहकारी सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ ला फलंदाजीचा सूर म्हणावा तसा मिळालेला दिसत नाही. त्यामुळे दिल्ली संघासमोर सलामी जोडीची समस्या आहे. रविवारच्या सामन्यात विजय मिळविण्यासाठी दिल्ली संघाला या समस्येवर तोडगा काढणे जरूरीचे आहे. पृथ्वी शॉने या स्पर्धेत नऊ सामन्यात 28.77 धावांच्या सरासरीने 259धावा जमविल्या. मागील सामन्यात दिल्लीने सलामी जोडीमध्ये बदल करताना वॉर्नरसमवेत मनदीप सिंगला सलामीला पाठविले. पण, तो लवकरच बाद झाला. मनदीप सिंगने तीन सामन्यांतून केवळ 18 धावा जमविल्याने पंतसमोर सलामीच्या जोडीची समस्या उभी राहिली आहे. रविवारच्या सामन्यात वॉर्नरसमवेत पुन्हा शॉ ला सलामीला पाठविण्याची शक्यता आहे. कर्णधार ऋषभ पंत आणि मिचेल मार्श यांना अद्याप अधिक धावा जमविता आलेल्या नाहीत.
वॉर्नरने या स्पर्धेत आठ सामन्यांतून 356 धावा जमविल्या आहेत. त्याने हैदराबादविरूद्ध सामन्यात नाबाद 92 धावांची खेळी केली होती. विंडीजच्या रोव्हमन पॉवेलला फलंदाजीचा सूर मिळाल्याचे जाणवते. गोलंदाजीमध्ये दिल्ली संघातील फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने या स्पर्धेत आतापर्यंत 18 बळी तर वेगवान गोलंदाज खलील अहमदने 14, शार्दुल ठाकूरने 10 तर मुस्तफिजूर रेहमानने 8 बळी घेतले आहेत. नोर्त्झेच्या पुनरागमनाने दिल्लीची गोलंदाजी अधिक भक्कम झाली आहे.
चेन्नई संघासमोर जखमी खेळाडूंची तसेच महत्त्वाच्या फलंदाजांचा सूर हरवल्याची प्रमुख समस्या आहे. चेन्नई संघातील महत्त्वाचे खेळाडू दीपक चहर आणि ऍडम मिलेनी यांना दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे तर सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड तसेच अष्टपैलू रविंद्र जडेजा यांची कामगिरी निष्प्रभ ठरली आहे. अंबाती रायडू, कर्णधार धोनी, शिवम दुबे, मोईन अली यांची काही सामन्यांत बऱयापैकी कामगिरी झाली. पण त्यांना सातत्य राखता आलेले नाही. चेन्नई संघातील कॉन्वेने तीन सामन्यांतून 144 धावा जमविल्या आहेत. महेश तिक्षणा, मुकेश चौधरी, ड्वेन ब्रॅव्हो हे चेन्नई संघातील प्रमुख गोलंदाज आहेत.
संभाव्य संघातील खेळाडू
दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत (कर्णधार), हेब्बार, वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, आर पॉवेल, नोर्त्झे, साकरिया, खलील अहमद, कुलदीप यादव, एन्गेडी, मुस्तफिजूर रेहमान, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, आर. पटेल, सर्फराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, के.एस. परब आणि सिफर्ट. चेन्नई सुपरकिंग्स- धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्रॅव्हो, अंबाती रायडू, रॉबिन उत्थप्पा, सँटेनर, जॉर्डन, मिलेनी, कॉन्वे, शिवम दुबे, प्रिटोरियस, महेश तिक्षणा, राजवर्धन हंगिंरगेकर, तुषार देशपांडे, असिफ, हरी निशांत, जगदीशन, एस. सेनापती, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग.