किणये : टाळ मृदंगाच्या गजरात, भंडाऱयाची उधळण करत, दुर्गामातेचा जयघोष करीत, यळेबैल गावात दुर्गामाता मूर्तीची सवाद्य मिरवणूक बुधवारी मोठय़ा उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला कलश घेऊन मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यळेबैल गावातील दुर्गामाता मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. बुधवारी दुर्गामाता मूर्तीची सवाद्य मिरवणूक बेळगुंदी येथील विठ्ठल रुक्माई मंदिर येथून काढण्यात आली. मिरवणुकीचे पूजन चाळोबा येळूरकर, भारतीय जवान संजय पाटील, जवान बळीराम पाटील, प्रदीप रायाणाचे, किरण पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले.
ही मिरवणूक बेळगुंदी, सोनोलीमार्गे यळेबैल गावात आली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या गजरासह टाळ-मृदंगाचा गजर झाला. गावात मंदिराचा लोकार्पण सोहळा असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणूक संपूर्ण गावात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गुरुवारी मंदिराचा वास्तुशांती कार्यक्रम होणार असून शुक्रवारी मूर्तीप्रति÷ापना, कळसारोहण व मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.