काँग्रेस समर्थकांकडून प्रकार ः माकप नेत्याने दिला धक्का
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
सोने तस्करी प्रकरणी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नाव समोर आल्यावर केरळमध्ये निदर्शनांनी जोर पकडला आहे. अशातच विमानातून प्रवास करत असलेल्या विजयन यांच्यासमोरच विरोधात घोषणाबाजी झाली आहे. युवा काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी विजयन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. विजयन हे कन्नूर येथून तिरुअनंतपुरम येथे जात असताना हा प्रकार घडला आहे.
एलडीएफ संयोजक ईपी जयराजन हे यावेळी विमानात विजयन यांच्यासोबत होते. त्यांनी निदर्शकांना रोखत विमानाच्या फ्लोअरच्या दिशेने धक्का दिला. विमानातील निदर्शने आणि धक्काबुक्की ही लँडिंगवेळी झाल्याने हा प्रकार नियमांचा उल्लंघन करणारा होता. युवा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार के.एस. सबरीनाथन यांनी सोशल मीडियावर याचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.
निदर्शक थेटपणे केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्या राजीनाम्याची मागणी करताना व्हिडिओत दिसून येतात. मागील आठवडय़ात सोने तस्करीसंबंधी नवा खुलासा झाल्यावर राज्यात निदर्शने सुरू झाली आहेत. केरळचे मुख्यमंत्री विजयन, त्यांची पत्नी आणि मुलीची सोने तस्करीत मुख्य भूमिका होता असा दावा मुख्य आरोपी स्वप्ना सुरेशने केला होता.