ऍपल कंपनीकडून अधिकृत घोषणा : 21 वर्षांपूर्वीचा प्रवास थांबला
नवी दिल्ली
एक काळ म्युझिक प्रेमींच्या पसंतीस उतरलेले आणि स्टेटसचा भाग ठरलेल्या आयपॉडची आता ऍपल निर्मिती करणार नाही. टेक कंपनी ऍपलने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. साधारणपणे ऍपल स्टोअर्समध्ये सध्या पुरवठा असेपर्यंत ग्राहकांना आयपॉड खरेदी करता येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
सदरचे आयपॉड 21 वर्षांपूर्वी 23 ऑक्टोबर 2001 रोजी बाजारात सादर केला होता. हा पहिला एमपी3 प्लेयर होता, ज्यात 1,000 पेक्षा अधिकची गाणी आणि 10 तासांपर्यंत बॅटरीची क्षमता असणारी सुविधा होती. दरम्यानच्या काळात कंपनीने आयपॉडचे विविध सुधारीत प्रकार बाजारात सादर केले आहेत. 2004 मध्ये आयपॉड मिनी सादर करण्यात आला तर 2006 मध्ये आयपॉड नॅनो तर 2007 मध्ये आयपॉड टच बाजारात आला.
ऍपल वर्ल्डवाईड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रेग जोस्वियाक यांनी म्हटल्या प्रमाणे ऍपलमधील म्युझिक कायमच लोकप्रिय राहिले आहे. संगीत शौकीनांमुळे आयपॉड हे लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहे. संगीतप्रेमींना एकेकाळी या आयपॉडने अमर्याद संगीताचा आनंद दिला आहे. ऍपलने मागील काही वर्षांमध्ये आयपॉडची विविध मॉडेल्स बाजारात आणली होती, परंतु आयफोन आणि अन्य उत्पादने त्यावर मात करतील असे सांगितले जात होते. काहीसा परिणाम झाला नाही असे नाही. मोबाईल फोन्स, आधुनिक फोन्समुळे आयपॉड मागे पडणार अशीही शक्यता व्यक्त केली गेली.
अन्य बाबी...
2014 मध्ये कंपनीने आयपॉड क्लासिक बनविणे बंद केले, 2017 मध्ये सर्वात लहान म्युझिक प्लेयर आयपॉड नॅनो व आयपॉड शफलला बंद केले
सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी 6 जानेवारी 2004 रोजी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मॅकवर्ल्ड परिषदेत व एक्सपोमध्ये आयपॉड मिनी सादर केले होते.
2007 मध्ये आयपॉड टचमध्ये टच स्क्रीन मॉडेल बाजारात आणले.