शारदा चिटफंड प्रकरणात ईडीची कारवाई, 6.30 कोटींची मालमत्ता सील
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शारदा चिटफंड प्रकरणी ईडीने शुक्रवारी मोठी कारवाई केली. ईडीने माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम, माजी आयपीएस अधिकारी आणि सीपीएमचे माजी आमदार देवेंद्रनाथ बिस्वास आणि आसामचे माजी कॅबिनेट मंत्री अंजन दत्त यांची 6 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत 3.30 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 3 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सदर प्रकरण पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशामध्ये शारदा समूहाने केलेल्या कथित चिटफंड घोटाळय़ाशी संबंधित आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, शारदा ग्रुप कंपनीने सुमारे 2,459 कोटी रुपये उभे केले आहेत, ज्यापैकी सुमारे 1,983 कोटी रुपये व्याजाची रक्कम वगळता ठेवीदारांना आजपर्यंत देय आहेत. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत सुमारे 600 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ही फसवणूक शारदा ग्रुपच्या अवैध योजनांच्या माध्यमातून जमा करण्यात आली आहे. शारदा ग्रुप 200 कंपन्यांचा समूह होता. अवघ्या काही वर्षांत शारदा समूहाने 2,500 कोटींची कमाई केली. ही बेकायदेशीर किंवा अवैध योजना सेबीच्या कारवाईनंतर 2012 मध्ये कोलमडली होती. 2014 मध्ये याचे मालक सुदीप्तो सेन आणि इतरांना मनी लाँड्रिंग आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.