प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर महानगरपालिकेप्रमाणे राज्यातील इतर नगरपालिकांमध्ये मालमत्ता कर आणि सेवा शुल्क आता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या भरता येणार आहे. भारत बिग पेमेंट अंतर्गत महापालिका मालमत्ता कर आणि सेवा शुल्क मोबाईल आणि संगणकाद्वारे भरता येणार आहे. त्यामुळे सेवा शुल्क भरणे आता सोयीस्कर होणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता आणि सेवा शुल्क जमा होणार असल्याने महसूलदेखील वाढणार आहे. वर्षभरापूर्वी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे ऑनलाईन सेवा शुल्क भरणे लांबणीवर पडले होते. पुन्हा आता या कामाला चालना देण्यात आली आहे. दरम्यान, प्रायोगिक तत्त्वावर सेवा शुल्क भरण्याचे काम यशस्वी झाले आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरच घरबसल्या मालमत्ता कर आणि सेवा शुल्क भरता येणार आहे.
भारत बिग पेमेंट व्यवस्थेनुसार सेवा शुल्क अदा करता येणार आहे. या सुधारित व्यवस्थेमुळे महसुलात वाढ होणार आहे. सध्या बँक, बेळगाव वन कार्यालय याठिकाणी मालमत्ता कर व सेवा शुल्क भरले जाते. मात्र आता ऑनलाईनद्वारे सेवा शुल्क भरता येणार आहे.