ग्रामस्थांची तक्रार ; विभागीय आयुक्तांचा निर्णय
देवराष्ट्रे/वार्ताहर
देवराष्ट्रे ता. कडेगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व पंधरा सदस्यांवर कारवाई करण्याचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी फेटाळला. याबाबत देवराष्ट्रे येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत तक्रार दिली होती. त्याबाबत विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
देवराष्ट्रे येथील सुधीर शिवाजी थोरात यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देवराष्ट्रे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांविरोधात फेब्रुवारी 2021 मध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेला अभ्यास दौरा हा खोटा असुन यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, तसेच बनावट बिलांचा वापर, दाखल्याचे आवकजावक नसून दाखल्यापोटी घेण्यात येणार्या रक्कमेत भ्रष्टाचार झाला आहे, बोगस ग्रामसमित्या स्थापने, कोरोना काळात अवाजवी खर्च दाखवून भ्रष्टाचार करणे, गटर स्वच्छतेत भ्रष्टाचार, वर्षभर पाणीपुरवठा न करता वर्षभराची पाणीपट्टी आकारणे असे अनेक आक्षेप घेण्यात आले होते. याबाबत ग्रामपंचायतीची दप्तर तपासणीही झाली होती. याबाबतचा अहवाल कडेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे दिला होता. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे कलम 39 अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. विभागीय आयुक्तांनी निर्णय घेत कारवाईचा प्रस्ताव फेटाळून लावला. या निर्णयाने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.