Tarun Bharat

लोकशाहीमुळेच देशात समृद्धता!

Advertisements

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार ः देशाला संबोधून भाषण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केले. लोकशाहीची पाळेमुळे देशाच्या मातीत केवळ रुजलेलीच नसून ती समृद्धही झाली आहेत. भक्कम लोकशाहीमुळेच देश समृद्ध होत असून भविष्यात हे तेज वाढत जाण्याचे संकेत मिळत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले. शंका उपस्थित करणाऱयांना भारतीयांनी चुकीचे सिद्ध केल्याचा दाखला देतानाच लोकशाहीची खरी क्षमता जगाला शोधण्यात मदत केल्याबद्दल भारताला श्रेय दिले जाऊ शकते, असेही त्या पुढे म्हणाल्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात आदिवासी समाजाच्या योगदानाबद्दल आणि महिलांच्या हक्कांबद्दलही ठळकपणे वक्तव्य केले. तसेच आर्थिक स्थितीबाबत बोलताना आता भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था निर्माण होत असल्याचेही नमूद केले. कोरोनाच्या काळात संपूर्ण जग संकटाचा सामना करत असताना भारताने स्वतःची काळजी घेतानाच अन्य देशांची काळजी घेतल्याबद्दल समाधानाची भावना व्यक्त केली. कोरोना संसर्गाच्या काळात भारताने स्वदेशी लसीच्या जोरावर मानवी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविली. गेल्या महिन्यात भारताने 200 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्याचे स्पष्ट करताना महामारीचा सामना करताना आपली कामगिरी जगातील विकसित देशांपेक्षा चांगली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

अमृतमहोत्सव देशवासियांना समर्पित

14 ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृतिदिन म्हणून साजरा केला जात आहे. हा स्मृतिदिन साजरा करण्यामागचा उद्देश सामाजिक सलोखा, मानवी सबलीकरण आणि एकात्मता वाढवणे हा आहे. दांडी यात्रेच्या स्मृती जागृत करून मार्च 2021 मध्ये ‘आझादीचा अमृत महोत्सव’ सुरू झाला. त्या युगप्रवर्तक चळवळीने आपला संघर्ष जागतिक पटलावर प्रस्थापित केला. त्यांची आठवण करून आमच्या अमृतमहोत्सवाची सुरुवात झाली असे सांगतानाच हा अमृतमहोत्सवी सोहळा देशवासियांसाठी समर्पित केला जात असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

सर्वच क्षेत्रात महिलांची झेप

बहुतेक लोकशाही देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. मात्र, भारताने प्रजासत्ताकच्या सुरुवातीपासूनच सार्वत्रिक प्रौढ मताधिकार स्विकारल्यामुळे महिलांना पहिल्यापासूनच मतदानाचा अधिकार मिळाला. आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य फार मोठे आहे. आताही महिलांच्या प्रगतीसाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. आज फायटर पायलटपासून ते अंतराळ शास्त्रज्ञापर्यंत सर्वच क्षेत्रात मुली आपला झेंडा फडकावत आहेत. भविष्यातही देशाच्या अनेक आशा मुलींच्या नव्या पिढीवर आहेत. संधी मिळाल्यास महिला-मुली मोठे यश संपादन करू शकतात, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.

मूलभूत कर्तव्ये जोपासा!

देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या मूलभूत कर्तव्यांची जपणूक केली पाहिजे. देशवासियांनी मूलभूत कर्तव्ये जोपासल्यास आपला देश नवीन उंचीला स्पर्श करू शकेल, असा आशावादही राष्ट्रपतींनी व्यक्त केला. आज देशात आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि त्यांच्याशी संबंधित इतर क्षेत्रांमध्ये चांगले बदल दिसून येत आहेत. हे बदल स्विकारण्यासाठी सुशासनावर विशेष भर देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

खुशखबर! ‘सीरम’ने केली आणखी एका लसीची घोषणा

datta jadhav

आता १२ वी च्या गुणांवरून केंद्रीय विद्यापीठात प्रवेश नाही

Sumit Tambekar

लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये काँग्रेसला फटका बसणार!

Patil_p

सार्वजनिक उद्योगांमध्येही अग्निवीरांना सामावून घेणार

Patil_p

निवडणुकीच्या धामधुमीत गुरमीत राम रहीमला ‘पॅरोल’

Patil_p

कोरोना लस हे अचानक मृत्यूचे कारण नाही

Patil_p
error: Content is protected !!