वन्यजीव सप्ताह निमित्त पंतप्रधानांचा संदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निसर्गाचे संरक्षण आणि प्राण्यांचे रक्षण भारतीय अध्यात्मिक आणि सांस्कृतिक संस्कारांचा अविभाज्य हिस्सा आहे. सामूहिक आणि जनभागीदारीच्या शक्तीने देश आता विविध क्षेत्रांमध्ये नवी उंची गाठत असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी काढले आहेत.
‘वन्यजीव सप्ताह’निमित्त एका संदेशात पंतप्रधानांनी ही संधी निसर्ग आणि जीवजंतूंच्या रक्षणाबद्दल लोकांना त्यांच्या जबाबदारीचे स्मरण करवून देत या दिशेने ठोस कार्य करण्याचे प्रेरणा देत असल्याचे नमूद केले आहे. वन्यजीवांसाठी मागील 8 वर्षांमध्ये देशात सुमारे 250 नव्या संरक्षित क्षेत्रांची भर पडली आहे तसेच वनक्षेत्रांचा विस्तारही वेगाने झाल्याचे मोदी म्हणाले.
गंगा नदी ही भारताच्या गौरवशाली संस्कृतीची साक्षीदार आहे. गंगा नदीला निर्मल आणि अविरल करणे आणि यातील जीवांचे रक्षण तसेच पर्यावरणीय व्यवस्थेच्या स्थितीत सुधार घडवून आणण्यासाठी ‘नमामि गंगे’ मोहीम अंतर्गत उल्लेखनीय कार्य करण्यात येत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
भूतकाळातील चुका सुधारून नव्या भविष्याच्या निर्मितीची संधी चित्त्यांना भारतात पुन्हा आणल्यावर प्राप्त झाली आहे. वन विभाग आणि सर्वसामान्यांच्या सहकार्याने हा पुढाकार यशस्वी ठरणार असा विश्वास आहे. देशात वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य मुदतीपूर्वीच गाठण्यात आले आहे. आसाममध्ये एक शिंग असलेल्या गेंडय़ांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच भारतात आशियाई सिंहांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हत्तींची संख्या देशात सातत्याने वाढत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद पेले आहे.
मानव, पर्यावरण आणि वन्यजीव परस्परांना पूरक आहेत. बदलत्या स्थितीत आम्हाला वन्यजीवांचे संरक्षण आणि जैववैविध्यासाठी अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. योग्य धोरण आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे अर्थव्यवस्था आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एकत्रित कार्य शक्य आहे. पर्यावरणाच्या रक्षणासोबत देशाची प्रगती होऊ शकते असे उद्गार त्यांनी काढले आहेत.