50 टक्क्यांनी महागले पेट्रोल-डिझेल ः लोक उतरले रस्त्यांवर
वृत्तसंस्था / ढाका
श्रीलंकेनंतर आता बांगलादेशात आर्थिक संकटाची चाहुल दिसून येत आहे. बांगलादेशात पेट्रोलच्या दरात 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्याने तेथेही श्रीलंकेसारखी स्थिती उद्भवली आहे. वाढत्या महागाईमुळे तेथील जनता रस्त्यांवर उतरली आहे. देशाच्या अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. संतप्त जनतेने पोलिसांच्या वाहनांचे नुकसान केले आहे. बांगलादेशातील सद्यस्थिती पाहता आगामी काळात स्थिती अधिकच बिघडण्याची दाट शक्यता आहे.
बांगलादेशच्या अर्थमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) 4.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज मागितले आहे. आर्थिक संकटाच्या उंबरठय़ावर असलेल्या बांगलादेशात अन्य देशांकडून आयात होणाऱया कच्च्या तेलाच्या पुरवठय़ात अडथळे निर्माण झाले आहेत. याचमुळे डिझेलद्वारे संचालित होणारा ऊर्जा प्रकल्प बंद पडला आहे. देशातील मध्यवर्ती बँकेच्या खजिन्यात मोठी घसरण झाल्याने अनेक प्रकारच्या सामग्रीच्या आयातीवर बंदी घालावी लागली आहे.
वीज, ऊर्जा आणि खनिज संपदा मंत्रालयाने इंधनाच्या किमतीतील वाढीवरून वक्तव्य प्रसारित केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कमी दरात इंधन विक्री केल्याने बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनला फेब्रुवारी ते जुलैदरम्यान मोठे नुकसान झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
का वाढले दर?
रशिया-युक्रेन युद्धाने दरवाढीमागे मोठी भूमिका बजावली आहे. बांगलादेशात पेट्रोलच्या दरात 51 टक्के तर डिझेलच्या दरात 42 टक्क्यांची वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे मागणी अन् पुरवठय़ाचे समीकरण बिघडले आहे. तर कोरोना संकटामुळे ओपेक देशांनी तेलाचा पुरवठा कमी केला आहे. यामुळे जगभरात पुरवठय़ावर प्रभाव दिसून येत आहे.
आयात वाढल्याने संकट
बांगलादेशातील आयात वाढणे आणि निर्यात घटल्याने स्थिती बिघडली आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेने स्वतःच्या अहवालात याचा उल्लेख केला आहे. आयात वाढल्याने बांगलादेशच्या विदेशी चलन भांडारात सातत्याने घट होतेय. जुलै 2021 पासून मे 2022 दरम्यान बांगलादेशकडून 81.5 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा 39 टक्क्यांनी अधिक आहे. तर दुसरीकडे कोरोना संकटामुळे निर्यात घटली आहे. यामुळे व्यापारी तूट वाढली आहे.
विदेशी चलन साठय़ात घट
मागील काही काळापासून विदेशात काम करणाऱया बांगलादेशींची उत्पन्न कमी होत आहे. विदेशी चलन साठय़ात घट होण्यामागे हे मोठे कारण आहे. वाढत्या आयातीने स्थिती अधिकच बिघडविली आहे. जुलै 2021 मध्ये विदेशी चलन साठा 45 अब्ज डॉलर्स इतका होता. तर चालू वर्षी 20 जुलैपर्यंत हे प्रमाण 39 अब्ज डॉलर्सवर आले आहे. हा आकडा केवळ 5 महिन्यांच्या आयातीला पुरेल इतकाच आहे.
चीनच्या विदेश मंत्र्यांचा दौरा
चीनचे विदेश मंत्री वांग यी हे सध्या बांगलादेशच्या दौऱयावर असून यावेळी अनेक द्विपक्षीय करार झाले आहेत. वांग यी यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि संस्कृतीशी निगडित काही करारांवर स्वाक्षऱया केल्या आहेत. चीन काही प्रकल्पांच्या निमित्ताने बांगलादेशातील स्वतःचा हस्तक्षेप वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर बांगलादेश चीनकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs खरेदी करत आहे. बांगलादेशातील चितगाव बंदरावर चीनची नजर असल्याचे मानले जात आहे.
बांगलादेशातील इंधन दर
5 ऑगस्ट
पेट्रोल 89 टका
डिझेल 77 टका
6 ऑगस्ट
पेट्रोल 135 टका
डिझेल 114 टका