प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवात देवस्थान कमिटीने फेरी विक्रेत्यांकडून यंदा 500 वरून 1 हजार रुपयांची मागणी केली. या निषेधार्थ फेरी विक्रेते संघटित होऊन सुमारे 70 टक्के दुकाने बंद ठेवून दुप्पट शुल्क वाढीचा निषेध केला. आठवडय़ासाठी एका दुकानासाठी 25 ते 30 हजार रुपये आकारले तर आम्ही येथे धंदा कसा करावा? असा सवाल फेरी विक्रेत्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे म्हापसा पालिका 1 हजार, देवस्थान कमिटी 1 हजार, जमीन मालक 1 हजार आदी पैसे घेण्यासाठी येतात, अशी माहिती विक्रेत्यांनी यावेळी दिली
बोडगेश्वर जत्रेच्या इतिहासात असा प्रकार प्रथमच घडला आहे. पालिका, जमीन मालक शेतकरी तसेच देवस्थान कमिटीने शुल्कात त्वरित कपात करावी, अशी मागणी देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांच्याकडे केली. मात्र त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने फेरी विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. आठ दिवसांसाठी प्रतिदिन एक हजार रुपये देऊ शकत नाही काय, अशी विचारणा देवस्थान समिती करीत असल्याचा, आरोप यावेळी फेरी विक्रेत्यांनी करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरूच होता.
शेतकऱयांच्या नावे भलतेच पैसे उकळतात ः बर्डे
दरम्यान, याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना बोडगेश्वर शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून म्हापसा पालिका येथे शुल्क घेते. मात्र पालिकेने येथे कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. प्रत्येकाकडून पालिका शुल्क आकारते येथे लोक आपला व्यवसाय धंदा करण्यासाठी येतात. यंदा 88 वा जत्रोत्सव सुरू आहे. मात्र असा प्रकार आतापर्यंत कधीच काही घडले नाही. आमदाराने काही लोकांना शुल्क आकारण्यास तयार केले आहे. शेतकरी समितीच्या नावे काही जण पैसे उकळत आहेत. ही आमदारांची बी टीम बसलेली आहे. त्यापेक्षा जत्रोत्सवाला पैसे आकारण्यास सरकारने अधिसूचना जारी करावी, असे बर्डे यावेळी म्हणाले.