प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य विनाअनुदानीत संघटनेच्या वतीने बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्यात येणार आहे. 1995 नंतर सुरू झालेल्या शाळा-कॉलेजना अनुदान मंजूर करावे, यासाठी मंगळवार दि. 20 रोजी बेमुदत आंदोलन केले जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानीत शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
गेली 27 वर्षात बेंगळूर व बेळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनावेळी अनेकवेळा आंदोलने झाली. तरी पण अद्याप शिक्षकांना न्याय देण्यात आलेला नाही. अनेक शिक्षक निवृत्तीच्या वाटेवर आहेत. तरीही अद्याप शाळांना अनुदान मिळालेले नाही. यामध्ये शिक्षक भरडले जात असून, केवळ आश्वासनांच्या पुढे कोणत्याच उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत.
यावर्षीचे हे आंदोलन महत्त्वाचे असल्याने राज्य सरकार समोर आपल्या मागण्या मांडण्यासाठी कर्नाटक राज्य विनाअनुदानीत शाळा, कॉलेज चालविणारे मंडळ व नोकरदार संघटना सहभागी होणार आहेत. बस्तवाड येथे उभारण्यात आलेल्या मंडप क्र. 5 मध्ये शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष मारुती आजानी यांनी केले आहे.