आंदोलन व कारखाना समर्थक हे आमने सामने आल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण
शिरोळ प्रतिनिधी
ऊस दराबाबत सुरू असलेले शिरोळ तालुक्यातील आंदोलन चिघळले असून भरलेली ऊसाने वाहने रोखल्याने ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शनिवारी शिरोळ तालुका बंदची हाक दिली आहे. तर ऊस उत्पादक शेतकरी वाहनधारक व कारखाना समर्थक पोलीस स्टेशनच्या आवारात आमने-सामने आल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पहाटे शिरोळ नरसोबावाडी रोडवरील शिरटी फाटा येथे ऊस भरून जाणारी वाहने रोखून धरली होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्या उसाचे नुकसान होऊ नये, वाहनातील ऊस साखर कारखान्याकडे गाळण्यासाठी नेण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु ‘आंदोल अंकुश’चे कार्यकर्ते यांनी ठाम भूमिका घेत साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केल्याशिवाय गेल्या वर्षीचा अंतिम हप्ता आरएसएफ फॉर्मुलानुसार मिळावा. मगच ऊस तोडी द्याव्यात अशी मागणी केली. तर ऊस उत्पादक शेतकरी व वाहन धारकानी गेल्या चार दिवसापासून आमचा ऊस वाळत आहे. आमचे आणि वाहनांचे नुकसान होत आहे त्यामुळे ही भरलेले उसाची वाहने कारखान्याकडे गाळपास जावीत अशी भूमिका आंदोलकांच्या समोर मांडली. आंदोलक वाहने सोडत नसल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहने कारखान्याकडे पाठवण्यास सुरुवात केली. आंदोलन व पोलिसात झटापट झाली काही का वातावरण तणावपूर्ण बनले होते. धनाजी चुडमुंगे यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.