सोने तस्करी प्रकरण : स्वप्ना सुरेश यांच्याकडून विजयन यांच्यावर आरोप
वृत्तसंस्था /तिरुअनंतपुरम
सोने तस्करी प्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. याप्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश यांनी विजयन यांचा सोने तस्करीत सहभाग असल्याचा दावा केला होता. तस्करीचे सोने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचविले जायचे असा दावा स्वप्ना यांनी केल्याने विजयन याच्या अडचणी वाढल्या आहेत. याप्रकरणी विजयन यांच्या विरोधात काँग्रेस तसेच भाजपने मोठी आघाडी उघडली आहे. विजयन यांच्या कुटुंबीयांचाही सोने तस्करीत हात असल्याचा आरोप झाला होता.
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात रस्त्यांवर उतरून निदर्शने केली आहेत. यादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने केली आहेत. तसेच भाजप आणि काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री विजयन हे पोलिसांचा गैरवापर करत चौकशीपासून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे.
कोझिकोडे आणि कोट्टायममध्ये युवा काँगेस आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आला. निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी यावेळी पाण्याचा मारा केला आहे.