राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमध्ये गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. जवळपास 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. भक्तांच्या देणगीतून ही मंडळे गणेशोत्सव साजरा करत असतात. मात्र त्यांच्याकडून वीजपुरवठय़ासाठी डिपॉझिट तसेच वीजबिल आकारले जाते. तेंव्हा वीजपुरवठा मोफत करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. कोरोना काळात तर या मंडळांना मोठा आर्थिक फटका बसला होता. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोफत वीजपुरवठा करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष अमोल देसाई, के. जी. पाटील, दुर्गेश मेत्री, आप्पासाहेब नाईक, विनायक पाटील, कृष्णा कांबळे, परशराम नाकाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.