वाघवडे ग्रामस्थांनी निवेदने देऊन केली मागणी : सर्व्हे करून तोडगा काढण्याचे अधिकाऱयांचे आश्वासन


वार्ताहर /किणये
वाघवडे गावात सुरळीत बससेवा आणि विद्युत पुरवठा करण्यात यावा, अशा मागणीची निवेदने वाघवडे ग्रामस्थांच्यावतीने हेस्कॉम व राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना सोमवारी देण्यात आली. ही निवेदने माजी महापौर शिवाजी सुंठकर व ग्रा. पं. सदस्य भावकाण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आली.
वाघवडे गावासाठी स्वतंत्र बससेवा होती. गावात वस्तीसाठी बस थांबून वाघवडे गावातून सकाळी बेळगावला जात होती. याचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना होत होता. अलीकडे गेल्या दिड महिन्यांपासून गावातील वस्तीची बससेवा रद्द करून वाघवडे गावच्या पुढे असलेल्या नवीन वसाहतीच्या गावांना वस्तीची बसफेरी सुरू करण्यात आली आहे. परिणामी नवीन वसाहतीच्या गावांमधून बस प्रवाशांनी भरून येत आहे. अन् यामुळे वाघवडे गावात काही वेळा बस थांबत नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसू लागल्याची माहिती गावकऱयांनी दिली.
विद्यार्थ्यांना गावातील बसथांब्यावर तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे शाळा-कॉलेजला जाण्यास उशीर होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती देण्यात आली. वाघवडे गावातील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात मच्छे, पिरनवाडी, बेळगाव या ठिकाणी शाळा-कॉलेजला येतात. विविध कामानिमित्त गावातील शेतकरी बांधवही बेळगावला ये-जा करतात. पूर्वीप्रमाणे गावात वस्तीची बससेवा सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना निवेदन दिले. या बससेवेबाबत आपण सर्व्हे करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱयांनी दिले.
हेस्कॉम अधिकारी प्रवीण चिकार्डे यांना निवेदन देण्यात आले. एस. बी. पाटील, एम. बी. देसाई, खाचूनी बेळगावकर, पुंडलिक नाईक, रघुनाथ नाईक, वामन हुंदरे, संजय मराठे आदींच्या दोन्ही निवेदनांवर सह्या आहेत.
निवेदन देताना एन. के. नलवडे, भुजंग गाडेकर आदींसह म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
खंडित वीज पुरवठय़ामुळे चोरीच्या घटना
वाघवडे गावातील यशवंतनगर येथे 24 तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या परिसरात 24 तास वीजपुरवठा आहे. मात्र, सध्या काही वेळा सकाळी 2 ते 4 तास व सायंकाळी 2 ते 3 तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
शेतकऱयांसह स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी 24 तास विद्युत पुरवठा गरजेचा आहे, असेही गावकऱयांनी सांगितले.