शौनक अभिषेकी यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
गेली अनेक तपे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेल्या पं. जितेंद्र अभिषेकींच्या स्मरणार्थ तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, कला अकादमी आणि राजीव गांधी कलामंदिर गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 24 रोजी व रविवार दि. 25 रोजी सकाळी 9.30 वा ते रात्री 9.30 वाजेपर्यंत राजीव गांधी कलामंदिर फोंडा येथे 16व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे शौनक अभिषेकी यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी मंत्री विनोद पालयेकर, कला अकादमीचे सदस्य सचिव विनेश आर्लेकर, कला अकादमीचे कार्यक्रम अधिकारी संजीव झर्मेकर उपस्थित होते.
या महोत्सवात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे 16 कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यात गोव्यामधील तसेच गोव्याबाहेरील विविध तरूण तसेच बुजुर्ग कलाकारांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका श्रुती सडोलीकर काटकर, देवकी पंडित, मंजुषा पाटील, नामवंत गायक विजय कोपरकर व रघुनाथ फडके यांचे गायन होणार आहे. युवा गायक सौरभ काडगावकर, सचिन नेवपूरकर व गायिका नोबेनिता चौधरी यांचे गायन होणार आहे. तसेच गोव्याचे वरदा बेडेकर, शैलेश गावकर, हे कलाकार आपल्या कलेने या महोत्सवामध्ये रंग भरतील. युवा सतारवादक कल्याणी देशपांडे व युवा संतूरवादक निनाद पैठणकर तसेच लोकप्रिय बासरी वादक अमर ओक यांचे वादन होणार आहे. कीबोर्ड वादक अभिजित पोहनकर यांचे शास्त्राrय गायन होणार आहे. गोव्याच्या प्रसिद्ध कथ्थक नर्तिका वरदा बेडेकर यांचे नृत्यसादरीकरण होणार आहे असे शौनक अभिषेकी यांनी सांगितले.
महोत्सवात मंगेश मुळये, सुधीर नायक, राया कोरगावकर, दयेश कोसंबे, चिन्मय कोल्हटकर, दत्तराज सुर्लकर, दत्तराज म्हाळशी, विठ्ठल खांडोळकर, प्रेमानंद आमोणकर, विठ्ठल मेस्त्राr, सुभाष फातर्पेकर, मयांक बेडेकर, दत्तराज शेटय़े, अमर मोपकर, तुळशीदास नावेलकर, विभव खांडोळकर, रोहिदास परब व उदय कुलकर्णी हे कलाकार साथसंगत करतील.
पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार ज्येष्ठ तबलावादक दयेश कोसंबे
दरवर्षी देण्यात येणारा पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार ज्येष्ठ तबलावादक दयेश कोसंबे यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या सांगितीक योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. महोत्सवाचे सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य करतील. तसेच हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य आहे. अशी माहिती अभिषेकी यांनी दिली.