साईराज चषक अ. भा. फुटबॉल स्पर्धा
बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित दहाव्या साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेच्या शनिवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अलफते मुंबई, एसआरएस गोवा पोलीस, बुफा अ बेळगाव पीटीएम कोल्हापूर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर आयोजित केलेल्या या फुटबॉल स्पर्धेच्या शनिवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात अलफते मुंबई संघाने साईराज एफसी बेळगाव संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात 21 व्या मिनिटाला अलफते मुंबईच्या अरमास अन्सारीच्या पासवर खतिब मोहम्मद याने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यावेळी साईराज एफसीच्या आघाडीच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या संधी दवडल्या. दुसऱया सत्रात पुन्हा अलफतेने आक्रमक चढाया सुरू केल्या. 42 व्या मिनिटाला साईराजच्या मंथनने गोल करण्याची सुवर्ण संधी वाया घालवली. 45 व्या मिनिटाला साईराजच्या जोतिबा पाटीलने मारलेला फटका गोलपोस्टला लागून गेला. 54 व्या मिनिटाला खतिबच्या पासवर अरमाश अन्सारीने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली.
दुसऱया उपांत्य फेरीच्या सामन्यात एसआरएस गोवा पोलीस संघाने दर्शन युनायटेड संघाचा सडन डेथमध्ये 6-5 अशा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांना निर्धारीत वेळेत गोल करण्यास अपयश आल्याने पंचांनी टायबेकर नियमाचा वापर केला. टायब्रेकरमध्ये दोन्ही संघांनी 5-5 अशी बरोबरी साधली. गोवातर्फे सचिनाथन सालसेकर, रोहित तोडट, पिटर, सॅम्युअल व विजय यांनी गोल केले. दर्शनतर्फे कौशिक पाटील, अखिलेश अष्टेकर, धनंजय, राहुल व जोतिबा यांनी गोल केले. यानंतर पंचांनी सडन डेथचा वापर केला. त्यामध्ये स्टिफनने गोल केला तर प्रतिक खाडेने मारलेला फटका गोलरक्षकाने अडविला.
तिसऱया उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बुफा बेळगाव संघाने ग्लोबल एफसी केरळ संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱया सत्रात 43 व्या मिनिटाला बुफाच्या किरण चौकाशीने डी बाहेरून मारलेली किक सरळ गोलमुखात गेली व 1-0 ची आघाडी बुफा अ संघाने मिळविली. त्यानंतर केरळ संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले व संधी दवडल्या. त्यामुळे त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. चौथ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पीटीएम कोल्हापूर संघाने ब्रदर एफसी संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेतेपाटीलच्या पासवर ओंकार पाटीलने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 17 व्या मिनिटाला पीटीएमचा आघाडीचा खेळाडू कैलास पाटीलने मारलेली वेगवान किक ब्रदर्स संघाच्या खेळाडूला लागून सरळ गोलमुखात शिरून 2-0 ची आघाडी मिळाली. 28 व्या मिनिटाला पीटीएमचा राईट आऊटर प्रथमेश हेरेकरने साईड लाईनजवळून सरळ चेंडू गोलपोस्टमध्ये मारून अप्रतिम गोल केला व पीटीएमला 3-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.
रविवारचे उपांत्य फेरीचे सामने
अलफते मुंबई वि. एसआरएस गोवा पोलीस यांच्यात सकाळी 8 वा., बुफा अ बेळगाव वि. पीटीएम कोल्हापूर यांच्यात सकाळी 9 वा. दुसरा उपांत्यफेरीचा सामना खेळविण्यात येणार आहे.