प्रतिसाद मिळत नसल्याने मनपाचा प्रयोग : पाचक्यांदा काढली निविदा
प्रतिनिधी /बेळगाव
जाहिरातीच्या माध्यमातून महापालिकेला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे शहरातील जाहिरात फलक तसेच स्मार्ट बसथांब्यावरील बॅकड्रॉप जाहिराती लावणे, विविध चौकात लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावर जाहिराती लावणे, रस्त्याशेजारी जाहिराती लावणे आदिंकरीता निविदा काढण्यात आल्या होत्या. पण निविदेची रक्कम कोटीच्या घरात असल्याने निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता जाहीर लिलाव आयोजित केला आहे.
स्मार्ट बसथांब्यावर जाहिराती लावण्यासाठी तसेच डिजिटल फलकावर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 2 कोटी 34 लाखाची निविदा आणि साडेतीन लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची निविदा काढण्यात आली होती. त्याचप्रमाणे सर्वच निविदांसाठी कोटीच्या घरात रक्कम निश्चित केली होती. सरकारी सुचनेनुसार जाहिरातीचे दर निश्चित करून निविदा मागविल्या होत्या. तसेच निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी अनामत रक्कम मोठय़ा प्रमाणात भरण्याची अट घातली होती. परिणामी निविदा प्रक्रियेत कोणीच भाग घेतला नाही. त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया बारगळली होती. त्यानंतर निविदा रकमेत कपात करून निविदा मागविल्या. तरीदेखील प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता महसूल विभागाने नव्याने निविदा मागविल्या असून यावेळी जाहीर लिलाव होणार आहे. यात भाग घेण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी नोंदणी करणे आवश्यक आहे. 20 रोजी सकाळी 11 पासून बोलीला प्रारंभ होणार आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी निश्चित केलेली रक्कम कोटीच्या घरात होती. मात्र यामध्ये कपात केली असून, लाखाच्या घरात केली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेला प्रतिसाद लाभणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
जाहिरातीचा तपशील | नव्याने मागविण्यात आलेली निविदेची रक्कम |
39 स्मार्ट बसस्थानकांवर बॅकड्रॉप जाहिराती प्रसिद्ध करणे डिजिटल फलक. | 39,00,000 |
कोल्हापूर क्रॉस, अशोक चौक, गोगटे चौक आणि गोवावेस चौकातील एलईडी स्क्रीनवर जाहिराती प्रसिद्ध करणे. | 48,00,000 |
पालिकेच्या 41 ठिकाणी जाहिरात फलक प्रसिद्ध करणे. | 16,59,372 |
महानगरपालिका व्याप्तिमध्ये खासगी जागेतील 89 जाहिरात फलकावर जाहिराती प्रसिद्ध करणे. | 34,83,720 |