प्रतिनिधी /मडगाव
कोंब -मडगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर असलेले सिग्नल झाडांच्या दाट पानांत लपल्यामुळे वाहनचालकांना बरेच अडचणीचे होत आहे.
या रेल्वे क्रॉसिंगवर असलेले सिग्नल वाहन चालकांना रेल्वेगेट बंद आहे का खुली आहे हे दाखविण्याचे काम करते. क्रॉसिंग बंद असेल तर वाहनचालक आपली वाहने भुयारी मार्गाने नेतात. मात्र या पावसाळय़ात सिग्नलजवळ असलेली झाडे वाढल्यामुळे सिग्नलला आपले स्वच्छ रुप वाहनचालकांना दाखवता येत नाही.
परिणामी, वाहनचालकांना या रेल्वे सिग्नलजवळ आल्यानंतर रेल्वे फाटक बंद असल्याची कल्पना येते व तोपर्यंत वाहन मागेही घेता येत नसल्याचा अनुभव आजपर्यंत शेकडो वाहनचालकांना आला आहे. एकेकदा 35 डबे असलेली मालगाडी येण्याची वेळ आणि ती जाईपर्यंतची वेळ मिळून 10-15 मिनिटे वाट पाहात राहावे लागते.
सकाळच्या सत्रात येथील दोन महाविद्यालयात जाण्याची शेकडो विद्यार्थ्यांना घाई असते आणि त्यात असे प्रसंग वाटय़ाला येत असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाच्या संबंधित विभागाने रेल्वे सिग्नलसमोर असलेल्या झाडाच्या फांद्या छाटाव्यात अशी जोरदार मागणी होत आहे.