वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानचे वर्चस्व आणि सरकार स्थापन झाल्यापासून प्रथमच बुधवारी एका फुटीरवादी व्यक्तीला जाहीररित्या फासावर लटकवण्यात आले आहे. या व्यक्तीवर हत्या केल्याचा आरोप होता. त्याला जाहीररित्या फाशी देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाला माहिती देण्यात आली होती, असे स्पष्ट करण्यात आले. इस्लामी न्यायसंकल्पनेनुसार डोळय़ासाठी डोळा आणि दातासाठी दात या नियमानुसार फासावर लटकवण्यात आले आहे. फाशी दिलेल्याचे नाव ताजमीर गुलाम सरवर असे असल्याचीही माहिती तालिबानकडून देण्यात आली.
आतापर्यंत तालिबानने गेल्या वर्षभरात आपल्या देशातील गुन्हेगारांना आणि सरकारच्या विरोधकांना कठोर शिक्षा दिलेली आहे. जाहीररित्या चाबकाचे फटके मारणे, दगडाने मारून जीव घेणे, अशा शिक्षा देण्यात आलेल्या आहेत. तथापि जाहीररित्या फाशीची शिक्षा प्रथमच देण्यात आलेली आहे. पाश्चात्य देशांनी या क्रूर शिक्षांचा निषेध केलेला असून त्या बंद कराव्यात, असे आवाहन केले आहे.