प्रतिनिधी / बेळगाव
शैक्षणिक वाटचालीत महत्त्वाच्या ठरणाऱ्या पीयूसी द्वितीय परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एक विद्यार्थी डिबार झाला. पीयूसी द्वितीय वर्षाची परीक्षा ही शैक्षणिक करिअर घडविण्यासाठी महत्त्वाची दिशादर्शक ठरते. त्यामुळे या परीक्षेचे विशेष महत्त्व असते. पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर झाला.
सकाळी 10.15 वाजता परीक्षेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी 9 वाजल्यापासूनच पालक आपल्या पाल्यांना घेऊन परीक्षा केंद्रांवर हजर होत होते. बेळगाव जिल्ह्यात एकूण 25 हजार 390 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे ओळखपत्र व हॉलतिकीट तपासूनच प्रवेश देण्यात येत होता. दरम्यान, राज्य परिवहन मंडळाने ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून दिली आहे.