ससेक्सकडून खेळताना 131 चेंडूत फटकावल्या 174 धावा
वृत्तसंस्था/होव्ह, इंग्लंड
भारताचा कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजाराने लिस्ट ए क्रिकेटमधील आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवताना 174 धावा फटकावल्या. येथे सुरू असलेल्या रॉयल लंडन चषक वनडे चॅम्पियनशिपमधील सामन्यात ससेक्स कौंटीकडून सरेविरुद्ध त्याने ही धावसंख्या नोंदवली. गेल्या 48 तासात त्याने नोंदवलेले हे दुसरे शतक आहे.
शुक्रवारी त्याने वार्विकशायरच्या गोलंदाजांचा समाचार घेत केवळ 79 चेंडूत 107 धावांची आतषबाजी केली. मात्र त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. रविवारी ससेक्सने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्या चार षटकांतच त्यांची स्थिती 2 बाद 9 अशी झाली. यानंतर टॉम क्लार्क (106 चेंडूत 104) व पुजारा यांनी तिसऱया गडय़ासाठी 205 धावांची द्वितशतकी भागीदारी करून संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली. या कामगिरीमुळे ससेक्सने 50 षटकांत 6 बाद 378 धावांचा डोंगर रचला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 55 धावांची सरासरी असणाऱया पुजाराने 50 षटकांच्या क्रिकेटमधील 13 वे शतक नोंदवताना 131 चेंडूत 20 चौकार व 5 षटकार ठोकले. 48 व्या षटकात तो बाद झाला, त्यावेळी त्याने एकटय़ाने संघाच्या (350) निम्म्या धावा केल्या होत्या. त्याने मॅट डन, कॉनर मॅकेर, रेयान पटेल या वेगवान गोलंदाजांना प्रत्येकी एक षटकार मारला. याशिवाय अमर वर्दी व युसूफ मजिद या स्पिनर्सनाही त्याने षटकार मारले.
कृणालचे 3 बळी
लीसेस्टरमधील ग्रेस रोड ग्राऊंडवर झालेल्या अन्य एका सामन्यात भारताचा डावखुरा स्पिनर कृणाल पंडय़ाने वार्विकशायरकडून खेळताना लीसेस्टरचे 69 धावांत 3 बळी मिळविले. कृणालने लुईस किम्बर (78), दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू वियान मुल्डर (68) व ऍरोन लिली (33) यांचे बळी मिळविले. लीसेस्टरने या सामन्यात 50 षटकांत 8 बाद 338 धावा जमविल्या.
उमेश यादवला 2 बळी
मिडलसेक्सकडून खेळणारा भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने सॉमरसेटचे 58 धावांत 2 बळी मिळविले. त्याने अँड्रय़ू उमीद (10) व कर्णधार जेम्स ऱयू (114) यांना बाद केले. उमेशने या स्पर्धेतील 4 सामन्यांत आतापर्यंत 13 बळी टिपले असून एकदा चार व एकदा पाच बळी मिळविले आहेत. सॉमरसेटने 50 षटकांत 6 ब्गगद 335 धावा जमविल्या.
अन्य एक सामन्यात केंटकडून खेळणारा भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला मात्र नॉर्दम्प्टनविरुद्ध 43 धावांत एकही बळी मिळविता आला नाही. नॉर्दम्प्टनचा डाव 210 धावांतच आटोपला. त्याला एकही बळी मिळाला नसला तरी त्याने आतापर्यंतच्या चार सामन्यात सर्वात कमी धावा दिल्या. याआधीच्या सामन्यांत त्याने 61, 71, 68 अशा धावा दिल्या होत्या.
महिलांच्या द हंड्रेड टी-20 स्पर्धेत भारताची जेमिमा रॉड्रिग्ज केवळ 2 धावांवर बाद झाली असली तरी नॉर्थर्न सुपरचार्जर्स या तिच्या संघाने लंडन स्पिरिटवर 5 धावांनी विजय मिळविला.