वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोवस्कीने काही वैयक्तिक कारणास्तव बेमुदत कालावधीसाठी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. या निर्णयामुळे पुकोवस्की ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत उपलब्ध होऊ शकणार नाही.
मार्श चषक स्पर्धेत तो गेल्या दोन सामन्यात खेळू शकला नाही. तसेच त्याला शेफिल्ड स्पर्धेसाठी निवडलेल्या संघामध्ये डच्चू देण्यात आला. शनिवारी होबार्टमध्ये टास्मानिया बरोबर त्याच्या संघाचा सामना होणार आहे. तो या स्पर्धेत व्हिक्टोरिया संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. 2022 क्रिकेट हंगामात पुकोवस्कीने व्हिक्टोरिया संघाकडून खेळताना दुहेरी शतक झळकविले होते. तसेच मार्श चषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात त्याने 64 धावा जमविल्या होत्या. पण त्यानंतर शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत त्याला तीन डावामध्ये विशेष धावा जमविता आल्या नाहीत. आता तो काही कालावधीसाठी क्रिकेट क्षेत्रातून अलिप्त राहणार असल्याचे व्हिक्टोरिया संघाचे व्यवस्थापक ग्रॅहॅम मॅनेयु यांनी सांगितले.