पुलाची शिरोली/ प्रतिनिधी
पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे प्रशांत गांधी यांच्या मळीराना जवळ नदीकाठावर मगरीचे पिल्लू सापडले आहे.
पंचगंगा नदी काठावर काही लोकांनी मासे पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यामध्ये बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास मगरीचे पिल्लू सापडले. सदर माहिती शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात समजताच पोलिसांनी तात्काळ वन विभागाचे कर्मचारी कृष्णात दळवी यांना फोन वरून माहिती दिली. त्यानंतर करवीरचे वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नरंदेचे वनपाल एस. एस. जाधव, शिये विभागाचे वन सेवक कृष्णात दळवी हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सदर मगरीचे पिल्लू ताब्यात घेऊन आदिवासात सोडण्यासाठी पाठवून दिले.
पंचगंगा नदी काठावर मगरीचे पिल्लू सापडल्याने ब्रम्हनाथ घाट ते वळीवडे धरण या परिसरात मगरीचे वास्तव्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधू, मच्छिमार व आंघोळीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.