पुणे/ प्रतिनिधी :
‘G 20’ परिषद तसेच पुणे शहरात मागील काही दिवसात दहशत माजविण्याच्या विविध घटनांमुळे पोलिसांनी शहरातील 3765 गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची चौकशी केली. चौकशीत 698 गुन्हेगार राहत्या पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले. सराईतांकडून पिस्तुलासह, काडतुसे, 145 कोयते जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर आणि पोलिसांची पथके या कारवाईत सहभागी झाली होती. पोलिसांमार्फत शहरातील हॉटेल, लॉज, एसटी स्थानके, रेल्वे स्थानक परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. सिंहगड रस्ता पोलिसांनी धायरी भागातील नीलेश शिवाजी गायकवाड (वय 35) याला पकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी 43 जणांना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून 145 कोयते, तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यातील बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकून हुक्का पार्लरचा मालक शाहरुख हारु शेख (वय 25) याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू जप्त केला. बेकायदा नायलॉन मांजा विक्री प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी 88 जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखेने 44 हजार रुपयांचा दारूचा माल आणि एक 50 हजार रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.