पुणे / प्रतिनिधी :
दुबईवरून विमानाने पुणे विमानतळावर आलेल्या एका महिला प्रवाशाच्या ताब्यातून सीमाशुल्क विभागाने 26 लाख 45 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. (Customs department seizes Rs 26 lakh gold from a female passenger from Dubai at Pune airport) जप्त करण्यात आलेल्या दागिन्यात सोन्याच्या दोन बांगडय़ा, तीन सोन्याच्या साखळय़ा असे 500 ग्रॅम वजनाचे 26 लाख रुपयांचे सोने असून ते तस्करीकरिता आणल्याचा दावा सीमा शुल्क विभागाने केला आहे. प्रवासी महिला व तिला घेण्याकरिता विमानतळावर आलेली महिला अशा दोघींना याप्रकरणी चौकशीसाठी सीमा शुल्क कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.
दुबई येथून सोन्याचे दागिने घेऊन 34 वर्षीय महिला स्पाईस जेटच्या विमानाने पुणे विमानतळावर पाच मे रोजी आली. तिच्याकडील सामानात सोन्याचे दागिने मिळून आल्याने त्याबाबत सीमा शुल्क विभागाने तिची सखोल चौकशी केली. त्यावेळी कच्च्या सोन्याच्या बांगडय़ा व सोनसाखळी ती तस्करीकरिता घेऊन आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिला घेण्याकरिता विमानतळावर आलेल्या 32 वषीय महिलेलाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर सीमा शुल्क विभागाने सीमा शुल्क कायद्यानुसार कारवाई करून अटक केल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे. नुकतेच पुणे विमानतळावर मागील महिन्यात दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून 465 जिवंत प्रवाळ सीमा शुल्क विभागाकडून जप्त करण्यात आले होते.