ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काश्मीरमधील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या एका तरुणाला पुणे दहशतवादी विरोधी पथकाने आज दापोली परिसरातून अटक केली आहे. राज्यातील घातपाती कारवायांसाठी त्याला या संघटनेकडून पैसे पुरविल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
जुनेद मोहम्मद (वय 18) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बेरोजगार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील गझवाते-अल-हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. महिनाभरापूर्वीच या संघटनेने तरुणाच्या खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. काही दिवसांपासून एटीएस आरोपीच्या मागावर होते. अखेर त्याच्या आज मुसक्या आवळण्यात आल्या.
या तरुणाला पैसे नेमके का पाठवण्यात आले? तो या पैशांचे काय करणार होता? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिग करण्यात आल्याचा एटीएसचा आरोप आहे. आज दुपारी या तरुणाला आरोपीला पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी एटीएसकडून त्याची कोठडी मागण्यात येणार आहे.