पुणे / वार्ताहर :
कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पुण्यातील व्यावसायिकाची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगलीतील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिवणे येथील 36 वर्षीय एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत रमेश पाटील (वय 25, रा. मोराळे (राजापूर), पलूस, सांगली), संतोषकुमार विष्णू गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर, सांगली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुण्यातील प्रभात रोडवरील कार्यालयात 20 ते 27 ऑगस्ट 2021 दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पतीची व्यावसायिक स्थिती चांगली असल्याचे पाहून आरोपी संतोषकुमार गायकवाड याने त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर आपला फॉरेक्स, टेडिंग व क्रिप्टो करन्सीचा व्यवसाय असून, ‘बेस्ट पॉईट इम्पॅक्ट जनरल टेडिंग’ या नावाने कंपनी असून, कंपनीचे प्रभात रोडवर कार्यालय असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांच्याकडे सुरुवातीला एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर पुन्हा 24 ऑगस्ट 2021 ला 80 लाख रुपये रोख दिले. याबाबत आरोपी संतोषकुमार गायकवाड याने समजुतीचा करारनामा लेखी स्वरूपात करुन दिला. मार्च 2022 मध्ये तुम्हाला देण्यात येणाऱ्या नफ्याच्या रक्कमेचा आपण संपूर्ण हिशेब करुन ती सहा टक्के दराने येणारी रक्कम तुम्हाला देण्यात येईल. तुम्ही आणखी दुसरी गुंतवणूक सुरु करा, म्हणजे मार्च महिन्यात तुमचा आणखी फायदा होईल, असे सांगितले. त्यानंतर तो दुबईला अचानक गेला.
दुबईवरून मार्च 2022 मधील पहिल्या आठवडय़ात संतोषकुमार गायकवाड पुण्यात आला. त्यानंतर तक्रारदार यांच्या परताव्याच्या रक्कमेचा हिशेब करुन तुम्हाला सुमारे 50 लाख रुपये नफा मिळणार आहे, असे सांगितले. त्यानंतर आणखी 20 लाख रुपये द्या, म्हणजे तुमची गुंतवणुक अडीच कोटी रुपये होईल, असे आरोपीने सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आणखी 20 लाख रुपये रोख प्रभात रोडच्या कार्यालयात नेऊन आरोपीस दिले. त्यानंतर आरोपी अचानक दुबईला निघून गेला. तक्रारदार महिलेच्या पतीने त्यास अनेकदा फोन केले. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि फोन घेणे बंद केले. प्रभात रोडवरील कार्यालय सुद्धा बंद केले. याबाबत पुढील तपास गुन्हे शाखा एक पथकाचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावंकर करीत आहेत.