ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पावसाळा आला की साथीचे रोग वेगाने पसरतात. डेंग्यूची साथ पसरण्यासाठीही पावसाळ्यात अनुकूल वातावरण तयार होत असते. सध्या राज्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 1146 एवढी आहे. त्यामधील सर्वाधिक म्हणजेच 305 रुग्ण हे पुण्यातील आहेत. पुणे शहरात 147, जिल्ह्यात 137 तर 27 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. (Pune tops dengue, chikungunya outbreak)
चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत पुणे टॉपवर आहे. पुण्यात चिकनगुनियाचे 187 रुग्ण आहेत. त्यापैकी 112 रुग्ण पुणे शहरात आहेत. तर ग्रामीण भागात 73 रुग्ण आहेत. डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन्हीमध्ये पुणे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
सध्या सततच्या पावसामुळे पाण्यात थंडी, ताप आणि सर्दीचे रुग्ण वाढत आहेत. तसेच डेंग्यूचे रुग्णही वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने प्रत्येक क्षेत्रिय कार्यालय पातळीवर स्वतंत्र पथक तयार केले आहे. डेंग्यूचा रुग्ण आढळलेल्या परिसरातील शंभरहून अधिक घरांची तपासणी करण्यात येत आहे. प्रामुख्याने फ्रिजच्या ट्रेमध्ये साठलेले पाणी, फ्लॉवरपॉट तसेच घराच्या छतावर व आजूबाजूला पडलेल्या खोलगट वस्तू, उदा. रिकामे डबे, टायर, नारळाच्या करवंट्या, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये साठलेले पाणी याचीही तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीमध्ये 15 ते 20 ब्रिडींग स्पॉट सापडत आहेत. त्याठिकाणी हे ब्रिडींग स्पॉट नष्ट करून औषध फवारणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 200 नागरिकांना हलगर्जीपणा केल्याबद्दल नोटीस पाठविण्यात आली असून, 28 हजार रुपये दंडही वसुल करण्यात आला आहे.
हेही वाचा : धूमशान …पावसाने गाठली जुलैची सरासरी
दरम्यान, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावसाळय़ात नागरिकांनी घरात, घरावर आणि परिसरात खोलगट वस्तूंमध्ये पाणी साठून डासांचे ब्रिडींग होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आवाहन महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे.