वृत्तसंस्था/ हैद्राबाद
नवव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथील गच्चीबोली इनडोअर स्टेडियममध्ये शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यात पुणेरी पलटनने हरियाणा स्टीलर्सचा तर बंगाल वॉरियर्सने तेलगू टायटन्सचा पराभव केला. अन्य एका सामन्यात बेंगळूर बुल्सने गुजरात जायंट्सचे आव्हान संपुष्टात आणले.
पुणेरी पलटन आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यातील सामन्यात अस्लम इनामदारचा खेळ आक्रमक आणि दर्जेदार झाला. इनामदारच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पुणेरी पलटनने हरियाणा स्टीलर्सचा 41-28 अशा 13 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात अस्लम इनामदारने 10 गुण मिळविले. त्यामध्ये एका बोनस गुणाचा समावेश आहे. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पुणेरी पलटनने हरियाणा स्टीलर्सवर 20-10 अशी आघाडी मिळविली होती. हरियाणा स्टीलर्सतर्फे मितुचा खेळ दर्जेदार झाला. सामन्याच्या उत्तरार्धात पुणेरी पलटनने हरियाणा स्टीलर्सचे सर्व गडी बाद करून 31-17 अशी भक्कम आघाडी मिळवली. हरियाणा स्टीलर्सला शेवटच्या दहा मिनिटांत 11 गुण मिळवता आले. पण पुणेरी पलटनने आपल्या गुणांमध्ये आणखी 10 गुणांची भर घातल्याने हरियाणा स्टीलर्सला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
शुक्रवारच्या दुसऱया सामन्यात कर्णधार मणिंदरसिंगच्या सुपर-10 गुणांच्या रेडवर बंगाल वॉरियर्सने तेलगू टायटन्सचा 36-28 अशा 8 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात कर्णधार मणिंदरसिंगने 12 गुण नोंदविले. श्रीकांत जाधवने 7 गुण मिळविले. तेलगू टायटन्सतर्फे सिद्धार्थ देसाईचा खेळ आक्रमक झाला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत बंगाल वॉरियर्सने तेलगू टायटन्सवर 14-13 अशा केवळ एका गुणाची आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातील पहिल्या दोन मिनिटातच बंगाल वॉरियर्सने आणखी 6 गुण मिळविले. तेलगू टायटन्सतर्फे अभिषेक सिंग आणि सिद्धार्थ देसाई यांनी आपल्या चढायांवर गुण मिळविले. 31 व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सने 25-19 अशी आघाडी मिळविली होती. 35 व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सने तेलगू टायटन्सवर 33-22 अशी बढत घेतली होती. अखेर बंगाल वॉरियर्सने हा सामना 8 गुणांच्या फरकाने जिंकला.
तिसऱया सामन्यात बेंगळूर बुल्सने गुजरात जायंट्सवर 45-38 अशी मात केली. या सामन्यात बेंगळूर बुल्सच्या भरतने आपल्या चढायांवर संघाला अधिक गुण मिळवून दिले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत बेंगळूर बुल्सने गुजरात जायंट्सवर 26-22 अशी 4 गुणांची आघाडी मिळविली होती. त्यानंतर बेंगळूर बुल्स संघातील भरतने आपल्या चढाईवर गुजरात जायंट्सच्या शंकर गडाई, चंदन रणजित आणि रिंकू नरवाल यांना बाद केले. बेंगळूर बुल्सने तिसऱयांदा गुजरात जायंट्सचे सर्व गडी बाद करून 9 गुणांची आघाडी मिळवली. मयुर कदम, महेंदर सिंग आणि सौरभ यांचा खेळ अधिक दर्जेदार झाला.