अलीकडे लहान मुले टीव्ही किंवा मोबाईल पाहण्यात दिवसाचे अनेक तास घालवतात. याचा परिणाम त्यांच्या शरीर प्रकृतीवर आणि मानसिकतेवर होत असतो. अत्यंत कमी वयात अशा मुलांची दृष्टी बिघडते. ती एकलकोंडी होतात. प्रतिकार करण्याची त्यांची क्षमता कमी होते आणि बालवयातच अकाली प्रौढत्वही येत असते. आई-वडिलांच्या दृष्टीने ही घराघरात चिंतेची बाब बनली आहे.
आई-वडील आपल्या मुलांची टीव्ही आणि मोबाईल पाहण्याची घातक सवय मोडावी यासाठी त्यांच्या परिने प्रयत्न करीत असतात. वेगवेगळे उपाय शोधतात. ही समस्या केवळ भारतातच आहे असे नाही तर चीनसारख्या बंदिस्त समाज व्यवस्था असणाऱया देशातही ही समस्या आहे. सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत असून तो अशा समस्येने पीडित असणाऱया चिनी आई-बापांचा आहे. हे चिनी आई-बाप आपल्या मुलाची टीव्ही आणि मोबाईल सोडण्यासाटी त्याला अधिक टीव्ही बघावयास लावत आहेत, असे या व्हिडिओमधून दिसून येते.
हे कुटुंब चीनच्या हुनान प्रांतातील आहे. या कुटुंबातील आई-वडील घराबाहेर जाताना आपल्या आठ वर्षाच्या मुलाला आपण येईपर्यंत होमवर्क पूर्ण करून ठेव असे सांगतात आणि आठ वाजता झोपावयास जाण्याचीही आज्ञा करतात. तथापि मुलगा आई-वडील बाहेर गेल्यानंतर टीव्ही पाहत बसतो, आई वडील आल्यानंतर त्यांना मुलाने होमवर्क पूर्ण केलेला नाही आणि तो टीव्ही बघत असलेला आहे असे दिसून येतो. त्यामुळे संतापाने ते त्याला रात्रभर टीव्ही बघण्याची शिक्षा करतात. या आई वडिलांना सोशल मीडियावर असंख्यांनी ट्रोल केले आहे. मुलाच्या अपराधापेक्षा तुम्ही त्याला केलेली शिक्षा भयानक आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. रात्रभर टीव्ही बघण्याची शिक्षा दिलेला हा मुलगा काही वेळ टीव्ही बघतो आणि नंतर रडू लागतो, असे या व्हिडिओत दिसते. तेव्हा आई वडिलांनी देखील संतापाच्या भरात आपल्या मुलांबद्दल चुकीचे कृत्य करू नये, असा संदेशच जणू या व्हिडिओवरून मिळतो असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे.