प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कचरापुंड्या हटविण्याची मोहीम महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल केली जात आहे. मात्र काही व्यावसायिक रस्त्याशेजारी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेच्यावतीने कडोलकर गल्ली येथील फळविक्रेत्यांना रंगेहात पकडून दंडात्मक कारवाई केली.
कचरा स्वच्छता कामगाराकडे द्यावा, असे आवाहन दररोज करण्यात येते. याकरिता शहरात वाहने फिरविण्यात येत आहेत. मात्र बाजारपेठेतील काही व्यावसायिक रस्त्याशेजारी कचरा टाकत असल्याचे प्रकार सातत्याने दिसून येतात. त्यामुळे कचराकुंड्या हटवूनदेखील बाजारपेठेत कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. घरोघरी जावून कचऱ्याची उचल करण्यासाठी वाहने व स्वच्छता कामगारांची नियुक्ती केली आहे. पण स्वच्छता कामगारांकडे कचरा देण्याऐवजी आपल्या सोयीनुसार हा कचरा व्यवसाय सुरू केलेल्या ठिकाणी किंवा रस्त्याशेजारी टाकून जात असतात. कडोलकर गल्लीतील काही व्यावसायिकांनी रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळे या व्यावसायिकांचा शोध घेऊन दंडात्मक कारवाई केली. मनपाच्या आरोग्य विभागाने तीन फळविक्रेत्यांकडून 1500 रुपये दंड वसूल केला. तसेच रस्त्याशेजारी कचरा टाकू नये, असा इशारा दिला. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.