वार्ताहर/बागणी
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील अनाधिकृत शाळांवर कारवाई करण्याबाबतच्या शासन आदेशान्वये वाळवा तालुक्यात सुरू असलेल्या अनाधिकृत शाळांना आज पंचायत समिती वाळवा शिक्षण विभागाच्या वतीने भेटी देऊन सदरच्या शाळा तात्काळ बंद कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकाड यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. वाळवा तालुक्यामध्ये हॅलो किड्स इंग्लिश मीडियम स्कूल, कुंडलवाडी (इयत्ता १ ली ते ३ री) व जीनियस इंग्लिश स्कूल, तांदुळवाडी (इयत्ता १ ली ते ५ वी) या शाळा अनाधिकृत असून या शाळांमध्ये आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेऊ नये याबाबतचे फ्लेक्स शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात आले. या अनाधिकृत शाळांच्या परिसरातील मुख्य चौक, रस्ते याठिकाणी फ्लेक्स लावावेत तसेच विविध प्रसार माध्यमांच्याद्वारे हे वृत्त प्रसारित करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) मधील तरतुदीनुसार संबंधित अनाधिकृत शाळेच्या व्यवस्थापनास १ लाख रुपये इतका दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिन रुपये १० हजार इतका दंड वसूल करणेबाबत सूचना संबंधितांना देण्यात आल्या. या अनाधिकृत शाळांच्या भेटीदरम्यान गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार, शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी, केंद्रप्रमुख स्नेहलता पाटील, विषयतज्ञ महेश पाटील, कोरेगाव नं. दोनचे मुख्याध्यापक सदाशिव वारे, शिक्षक भिवाजी सावंत हे उपस्थित होते.