वृत्तसंस्था /वॉशिंग्टन, चंदिगढ
खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंग यांच्यावर पंजाबमध्ये सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मुलीला खलिस्तानवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे. भगवंत मान यांची मुलगी सीरत कौर मान हिला फोनवरून धमकावण्यात आले आहे. तसेच शिवीगाळही करण्यात आली. सीरत ही भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. ती आई आणि भाऊ दिलशानसोबत अमेरिकेत राहते. मान यांचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला आहे. अमेरिकेत राहणाऱया भगवंत मान यांची दोन मुले सीरत कौर मान आणि मुलगा दिलशान यांनाही खलिस्तानी समर्थकांनी वेढा घालण्याची योजना आखल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. खलिस्तानींनी अमेरिकेतील गुरुद्वाराला वेढा घालण्याचा ठरावही मंजूर केला आहे. सीरत कौरच्या कौटुंबिक वकील हरमीत कौर ब्रार यांनी या धमकीचा खुलासा केला आहे. धमकी देणाऱयाने घाणेरडे आणि असभ्य शब्द वापरून आणि शिवीगाळ करून खलिस्तानवादाचे समर्थन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सीरत कौरला खलिस्तानी समर्थकांनी वेगवेगळय़ा नंबरवरून तीनवेळा कॉल केल्याचे सांगण्यात आले. सदर नंबर सध्या ब्लॉक करण्यात आले आहेत.