चंदीगडमध्ये डॉ. गुरप्रीतसोबत अडकणार विवाहबंधनात
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज विवाह करणार आहेत. भगवंत मान यांनी पहिल्या पत्नीकडून घटस्फोट घेतला आहे. पहिल्या विवाहापासून त्यांना दोन अपत्य असून ते अमेरिकेत राहत आहेत. चंदीगडमध्ये गुरुवारी होणाऱया विवाहाची तयारी करण्यात आली असून या सोहळय़ात अत्यंत नजीकचे लोकच सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भगवंत मान हे डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत.
मान यांचा हा विवाहसोहळा मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी पार पडणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया देखील स्वतःच्या कुटुंबासमवेत या विवाहसोहळय़ात सामील होणार आहेत. डॉ. गुरप्रीत कौर या मान यांच्या कुटुंबाच्या निकटवर्तीय आहेत. दीर्घकाळपासून भगवंत मान आणि गुरप्रीत कौर या परस्परांना ओळखत आहेत.
भगवंत मान यांच्या विवाहसोहळय़ाच्या तयारीची जबाबदारी आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राघव चड्ढा यांनी स्वतःकडे घेतली आहे. राघव चड्ढा हेच सर्व तयारी करत आहेत. या सोहळय़ात मोजक्या लोकांनाच सामील होता येणार आहे.
हा विवाहसोहळा शिख परंपरेनुसार होणार असल्याने सर्व तयार करण्यात आली आहे. या विवाहसोहळय़ाचा सर्व खर्च स्वतः भगवंत मान करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. गुरप्रीत कौर या हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहेत. भगवंत मान हे सध्या 48 वर्षांचे आहेत.
2014 मध्ये भगवंत मान हे संगरूर मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले होते. तेव्हा त्यांची पहिली पत्नी इंद्रजीतने प्रचार केला होता, परंतु 2016 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा भगवंत मान यांनी पंजाब किंवा कुटुंब यापैकी एकाची निवड करायची होती आणि मी पंजाबची निवड केल्याचे म्हटले होते.