Tarun Bharat

‘टेबलटॉपर्स’ गुजरातला पंजाब किंग्सने लोळवले!

नवी मुंबई / वृत्तसंस्था

कॅगिसो रबाडाचे 4 बळी आणि शिखर धवन-राजपक्ष-लिव्हिंगस्टोन यांच्या फटकेबाजीच्या बळावर पंजाब किंग्सने आयपीएल साखळी सामन्यात टेबलटॉपर्स गुजरात टायटन्सचा 8 गडी व 4 षटकांचा खेळ बाकी राखत अक्षरशः एकतर्फी धुव्वा उडवला. गुजरातने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 बाद 143 धावा केल्या तर प्रत्युत्तरात पंजाबने 16 षटकातच 2 बाद 145 धावांसह धडाकेबाज विजय संपादन केला.

विजयासाठी 144 धावांचे आव्हान असताना बेअरस्टो एका धावेवर बाद झाल्याने पंजाबची खराब सुरुवात झाली. मात्र, शिखर धवनने प्रारंभी राजपक्षसह (28 चेंडूत 40) दुसऱया गडय़ासाठी 87 धावांची दमदार भागीदारी साकारली आणि त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनच्या (10 चेंडूत नाबाद 30) साथीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

रबाडाचे 4 बळी

प्रारंभी, स्पीडस्टार कॅगिसो रबाडाने भेदक गोलंदाजी साकारत अवघ्या 33 धावात 4 बळी घेतल्यानंतर पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला 8 बाद 143 अशा माफक धावसंख्येवर रोखण्याचा भीम पराक्रम गाजवला होता. गुजराततर्फे केवळ साई सुदर्शनने 50 चेंडूत नाबाद 65 धावांची आतषबाजी केली. पंजाबच्या गोलंदाजांनी या डावात गुजरातसारखा तगडा प्रतिस्पर्धी संघ मैदानात उभा ठाकला असताना केवळ 11 चौकार व 2 षटकार दिले, ते लक्षवेधी ठरले.

सुदर्शनने 5 चौकार व 1 षटकार फटकावला. मात्र, त्याचे अन्य सहकारी फलंदाज ठरावीक अंतराने परतत राहिले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंडय़ाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय यावेळी त्याच्यावरच उलटल्याचे सिद्ध झाले.

सलामीवीर शुभमन गिल (9) व वृद्धिमान साहा (21) स्वस्तात बाद झाले. दोन चौकार फटकावणारा शुभमन गिल हा तिसऱया षटकात कव्हरमधील ऋषी धवनच्या थेट थ्रोमुळे धावचीत होत परतला. त्यानंतर पुढील षटकात साहाने मिडऑफवरील प्रतिस्पर्धी कर्णधार मयांक अगरवालकडे सोपा झेल देत रबाडाला पहिली विकेट बहाल केली. 3 चौकार व 1 षटकार फटकावणाऱया साहाला उसळत्या चेंडूचा अंदाज आला नाही. पुढे, ऋषी धवनने (1-26) हार्दिक पंडय़ाला (1) स्वस्तात बाद केल्यानंतर गुजरातची 3 बाद 44 अशी पडझड झाली. हार्दिकचा लेंग्थ बॉल फटकावण्याचा प्रयत्न फसला आणि यष्टीरक्षक जितेश शर्माने सोपा झेल पूर्ण केला.

त्यानंतर सुदर्शन व डेव्हिड मिलर (11) यांनी 30 चेंडूत 23 धावा जोडल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने (1-15) मिलरला बाद केल्यानंतर गुजरातची 4 बाद 67 अशी स्थिती झाली. यावेळी लाँगऑफवरील रबाडाने मिलरचा झेल टिपला. पुढे, सुदर्शनने 11 व्या षटकानंतर लिव्हिंगस्टोनला आपला पहिला चौकार फटकावत फलंदाजीचा गियर बदलला. रबाडाने राहुल तेवातिया (11) व रशिद खान (0) यांना सलग 2 चेंडूंवर बाद करत गुजरातची 6 बाद 112 अशी आणखी दाणादाण उडवली. नंतर त्याने लॉकी फर्ग्युसनला बाद करत आपला डावातील चौथा बळी नोंदवला. पंजाबतर्फे संदीप शर्मा (0-17), अर्शदीप सिंग (1-35), राहुल चहर (0-11), लिव्हिंगस्टोन (1-15) यांनीही समयोचित मारा केला.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स ः 20 षटकात 8 बाद 143 (साई सुदर्शन 50 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 65, वृद्धिमान साहा 17 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 21, डेव्हिड मिलर व राहुल तेवातिया प्रत्येकी 11. अवांतर 14. रबाडा 4-33, अर्शदीप, ऋषी धवन व लियाम लिव्हिंगस्टोन प्रत्येकी 1 बळी).

पंजाब किंग्स ः 16 षटकात 2 बाद 145 (शिखर धवन 53 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 62, भानुका राजपक्ष 28 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 40, लियाम लिव्हिंगस्टोन 10 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 30. अवांतर 12. शमी 1-43, लॉकी फर्ग्युसन 1-29).  

ऋषी धवनचा थेट थ्रो आणि शुभमन गिलची निराशा!

गुजरात फलंदाजी करत असताना तिसऱया षटकातील पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलचे धावबाद होणे नाटय़मय ठरले. संदीप सिंगचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटकावून गिलने एकेरी धावेसाठी कॉल दिला. शॉर्टेस्ट पॉसिबल लाईनवर धावले तरच धाव पूर्ण होईल, याची कल्पना असल्याने शुभमनने सरळ दिशेने धावणे पसंत केले. मात्र, फॉलोथ्रूमध्ये संदीप सिंग मार्गात येऊन त्याला धडक बसल्याने शुभमनला वेळेत पोहोचता आले नाही आणि दुसरीकडे, ऋषीच्या थेट थ्रो मुळे शुभमनला धावचीत होत परतावे लागले.

शमीच्या एकाच षटकात लिव्हिंगस्टोनने लुटल्या 28 धावा!

शेवटच्या 30 चेंडूत 27 धावांची आवश्यकता असताना पंजाबच्या लियाम लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शमीच्या एकाच षटकात तब्बल 28 धावांची लयलूट करत पंजाब किंग्सला अंतिमतः एकतर्फी विजय संपादन करुन दिला. लिव्हिंगस्टोनने या षटकात सलग 3 षटकार, 2 चौकार व दुहेरी धावांची आतषबाजी केली. त्याने पहिला चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर, दुसरा फुलटॉस चेंडू थेट गॅलरीकडे तर तिसरा चेंडू यष्टीरक्षकावरुन षटकारासाठी फटकावला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार व पाचव्या चेंडूवर 2 धावा घेत विजय दृष्टिक्षेपात आणला आणि शेवटच्या चेंडूवर थर्ड मॅनकडे आणखी एक चौकार वसूल करत अगदी थाटात विजयावर शिक्कामोर्तब केले!

Related Stories

शेवटच्या प्रयत्नातही मो फराहला अपयश

Amit Kulkarni

ऑलिम्पिक तिकीट मिळवलेला कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल

Archana Banage

भारताचा इंग्लंडविरुद्ध एकतर्फी मालिकाविजय

Patil_p

किदाम्बी श्रीकांत दुसऱया फेरीत दाखल

Amit Kulkarni

मँचेस्टर सिटीचा बर्नलीवर मोठा विजय

Patil_p

भारत-इंग्लंड महिला संघात आज लढत

Patil_p