ऑनलाईन टिम : मानसा
पंजाबी गायक सिद्धू मूसे वाला उर्फ शुभदीप सिंग सिद्धू याच्या हत्येचा तपास करण्यासाठी मानसा पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेण्यासाठी हालचाली करत आहेत. या हत्येचा मुख्य सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई असल्याचा पंजाब पोलिसांना संशय असून त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर पंजाबला आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मानसाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) गौरव तोरा यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेल्या मार्गाचा शोध एसआयटीने घेतला आहे.
पुढे बोलताना अधिक्षक म्हणाले, “ते कोणत्या दिशेने पळाले याचा शोध लागला असून गुन्ह्यात वापरून सोडून दिलेल्या वाहनांमध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या दोन सदस्यांना प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले आहे.”
“गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई यांच्या सहभागाची चौकशी होणार असून आम्हाला खात्री आहे की त्याच्याकडे या हत्याकांडाबद्दल महत्वाची माहिती आहे.” असेही पोलीस अधिकारी गौरव तोरा म्हणाले. बिश्नोई सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने, पंजाब पोलिस सध्यातरी त्याचा रिमांड घेऊ शकत नाही.