वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाच्या पहिल्या कनिष्ठ पुरुषांच्या 2023 सालातील विभागीय हॉकी स्पर्धेमध्ये पंजाब, तामिळनाडू, झारखंड आणि मध्यप्रदेश या चार संघांनी आपल्या विभागातून विजेतेपद मिळविले आहे.
उत्तर विभागाच्या जेतेपदासाठी झालेल्या पहिल्या सामन्यात हरियाणाने चंदिगडचा 2-1 असा पराभव करत या विभागात तिसरे स्थान मिळविले. त्यानंतर या विभागातील अंतिम सामन्यात पंजाबने उत्तर प्रदेशचा 3-2 असा पराभव करुन उत्तर विभागातून विजेतेपद पटकाविले.
दक्षिण विभागातील जेतेपदासाठी तामिळनाडूमध्ये झालेल्या सामन्यात केरळने आंध्रप्रदेशचा 4-3 असा पराभव करुन तिसरे स्थान पटकाविले. त्यानंतर अंतिम सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 अशा गोलफरकाने पराभव करत विभागीय जेतेपद मिळविले.
पूर्व विभागातील जेतेपदासाठीच्या मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बिहारने बंगालचा 3-1 असा पराभव करत तिसरे स्थान मिळविले. या विभागातील जेतेपदासाठीच्या लढतीत झारखंडने ओडिशाचा 3-1 असा पराभव करुन पूर्व विभागाचे जेतेपद पटकाविले.
पश्चिम विभागातील जेतेपदासाठीच्या अंतिम सामन्यात मध्यप्रदेशने राजस्थानचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघ निर्धारित वेळेत 1-1 असे बरोबरीत होते.