सनरायजर्स हैदराबादवर 5 गडय़ांनी मात, हरप्रीत ब्रार सामनावीर, लिव्हिंगस्टोनच्या नाबाद 49 धावा
वृत्तसंस्था/ मुंबई
गोलंदाजांनी केलेला अचूक मारा आणि लिव्हिंगस्टोन, धवन यांनी केलेली समयोचित फलंदाजी यांच्या बळावर पंजाब किंग्सने आयपीएलमधील शेवटच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 5 गडय़ांनी पराभव करून सहाव्या स्थानावर या मोसमाची सांगता केली. 26 धावांत 3 बळी मिळविणाऱया हरप्रीत ब्रारला सामनावीराचा बहुमान मिळाला.
प्रथम फलंदाजी निवडल्यावर सनरायजर्स हैदराबादला 20 षटकांत 8 बाद 157 धावा जमविता आल्या. हरप्रीत ब्रार व नाथन एलिस यांनी प्रत्येकी 3 बळी मिळविळे. त्यानंतर पंजाब किंग्सने 15.1 षटकांतच 5 बाद 160 धावा जमवित विजय साकार केला. लिव्हिंगस्टोनने 22 चेंडूत नाबाद 49 धावा फटकावताना आयपीएलच्या या मोसमातील 1000 वा षटकार नोंदवला. या खेळीत त्याने 5 उत्तुंग षटकार ठोकले. त्याआधी शिखर धवन (32 चेंडूत 39), जितेश शर्मा (7 चेंडूत 19) यांनी फटकेबाजी केली. याशिवाय बेअरस्टोने 23, शाहरुख खानने 19 धावा काढल्या. हैदराबादच्या फारुकीने 2, उमरान मलिक, सुंदर, सुचित यांनी एकेक बळी मिळविला. साखळी फेरीअखेर पंजाबने 14 गुणांसह सहावे स्थान मिळविले तर हैदराबादला 12 गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
राष्ट्रीय संघातील निवड साजरी करताना पंजाबच्या अर्शदीप सिंगने बळी मिळविला नसला तरी त्याने 4 षटकांत केवळ 25 धावा दिल्या तर त्याचा साथीदार हरप्रीत ब्रारने अचूक मारा करीत 26 धावांत 3 बळी मिळविले. त्याला नाथन एलिसने 40 धावांत 3 बळी घेत चांगली साथ दिली.
या स्पर्धेतील प्लेऑफमधील चार संघ शनिवारीच निश्चित झाले असल्याने या लढतीला औपचारिक स्वरूप प्राप्त झाले होते. ऑरेंज आर्मी सनरायजर्सचे फलंदाज या लढतीत फारसे उत्साही वाटत नव्हते. त्यामुळे सामन्याच्या बऱयाच टप्प्यात त्यांची धावगती संथ होती. फक्त अखेरच्या काही षटकांत त्यांनी जोरदार फटकेबाजी करीत दीडशेची मजल मारली. सनरायजर्सचा या मोसमातील सर्वोत्तम फलंदाज ठरलेल्या अभिषेक शर्माने (32 चेंडूत 43) पुन्हा एका चांगली सुरुवात केली. पण त्याला त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता आले नाही.
गंभीर वाटणाऱया राहुल त्रिपाठीने (20) चारशे धावांचा टप्पा पार करीत वैयक्तिक माईलस्टोन गाठला, पण राष्ट्रीय संघात निवड न झाल्याची निराशा त्याच्या खेळात जाणवत होती. ब्रारने विशेष काही न करता यष्टीच्या रोखाने गोलंदाजी करण्याचे धोरण ठेवत हैदराबादच्या फलंदाजांना जखडून ठेवले. रोमारिओ शेफर्ड (15 चेंडूत नाबाद 26) व वॉशिंग्टन सुंदर (19 चेंडूत 25) यांनी फटकेबाजी केल्यामुळे हैदराबादला दीडशेच्या पुढे मजल मारता आली. लांब हँडलचा उपयोग करीत या दोघांनी 4.5 षटकांत सहाव्या गडय़ासाठी 58 धावांची भागीदारी केली. तसे पाहता शेवटच्या चार षटकांतच 50 हून अधिक धावा निघाल्या. नाथन एलिसने एकाच षटकात 2 बळी मिळविले असले तरी त्याच्या गोलंदाजीवर बऱयाच धावा निघाल्या. त्याला हॅट्ट्रिकची संधी होती. पण भुवनेश्वर कुमारने ती हुकवली, मात्र तो चोरटी धाव घेताना धावचीत झाला. रबाडाला एका बळीसाठी 38 धावा मोजाव्या लागल्या.
संक्षिप्त धावफलक ः सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 8 बाद 157 ः गर्ग 4, अभिषेक शर्मा 43 (32 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), त्रिपाठी 20 (18 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), मॅरक्रम 21 (17 चेंडूत 2 चौकार), पूरन 5, सुंदर 25 (19 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), शेफर्ड नाबाद 26 (15 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), अवांतर 12. गोलंदाजी ः हरप्रीत ब्रार 3-26, एलिस 3-40, रबाडा 1-38, अर्शदीप 0-25, लिव्हिंगस्टोन 0-25.
पंजाब किंग्स 15.1 षटकांत 5 बाद 160 ः बेअरस्टो 23 (15 चेंडूत 5 चौकार), धवन 39 (32 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), शाहरुख खान 19 (10 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अगरवाल 1, लिव्हिंगस्टोन नाबाद 49 (22 चेंडूत 2 चौकार, 5 षटकार), जितेश शर्मा 19 (7 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), मंकड नाबाद 4, अवांतर 6. गोलंदाजी ः फझलहक फारुकी 2-32, सुंदर 1-19, सुचित 1-38, उमरान मलिक 1-24, शेफर्ड 0-23 (1 षटक).