वृत्तसंस्था/ सेंट जॉन्स, अँटिग्वा
विंडीज क्रिकेट मंडळाने मंगळवारी वनडे व टी-20 संघांसाठी निकोलस पूरनची कर्णधारपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. कीरन पोलार्डने निवृत्ती घेतल्यामुळे त्याच्या जागी पूरनची निवड करण्यात आली आहे.
गेले वर्षभर तो या संघांचा उपकर्णधार होता. यावर्षी होणाऱया पुरुषांचा टी-20 विश्वचषक तसेच पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱयह वनडे विश्वचषक स्पर्धेत पूरन नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. वनडेसाठी शाय होपकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘निकोलसला जगभरातील विविध लीग्समध्ये खेळण्याचा अनुभव असून त्याने पोलार्डच्या गैरहजेरीत नेतृत्वाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. याशिवाय खेळाडू म्हणून त्याची कामगिरीही प्रभावी झाली असून सर्व संघसहकाऱयांकडून त्याला आदरही मिळतो. या सर्व बाबींचा विचार करून मर्यादित षटकांच्या संघांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी आम्ही त्याच्यावर सोपवली आहे,’ असे विंडीज क्रिकेटचे संचालक जिमी ऍडॅम्स म्हणाले.
मागील वर्षी पोलार्डच्या गैरहजेरीत पूरनने नेतृत्व करीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकाविजय मिळवून दिला. या यष्टिरक्षक फलंदाजाने टी-20 मध्ये आठ अर्धशतके तर वनडेमध्ये एक शतकही नोंदवले आहे. 31 मेपासून ऍम्स्टलव्हीनमध्ये नेदरलँड्सविरुद्ध होणारी तीन सामन्यांची वनडे मालिका होत असून पूरनची कर्णधारपदाची ही पहिली मालिका असेल.