जगातील तिसरी मोठी बँकः 2022 मध्ये 17 टन सोन्याची खरेदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एप्रिल 2020 पासून सप्टेंबर 2022 पर्यंत रिझर्व्ह बँकेने 132.34 टन इतके सोने खरेदी केले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. जगातील कोणत्याही बँकेने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी केलेले नाही, अशीही माहिती समोर आली आहे. 2022 मध्ये 17.46 टन इतक्या सोन्याची खरेदी रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आली असून ही सर्वात मोठी तिसरी बँक आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सप्टेंबर 2022 पर्यंतच्या कालावधीत 785.35 टन इतके सोने साठले आहे. 1 एप्रिल 2018 पासून 30 सप्टेंबर 2022 पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या सोने साठय़ात 225.03 टन इतकी भर पडली आहे. सप्टेंबर तिमाहीत जगभरातील केंद्रीय बँकांनी 400 टनहून अधिक सोने खरेदी केले आहे, जे एक वर्षाच्या प्रमाणात पाहता चारपट अधिक आहे. यावर्षी 17.46 टन सोने खरेदी करत भारतीय रिझर्व्ह बँक जगातील तिसरी मोठी खरेदीदार ठरली आहे.
का होते सोन्याची साठवण
डॉलरमध्ये मजबुती राहिल्याने जगभरातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदीवर भर दिला होता. रिझर्व्ह बँकेसह इतर देशातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदी करण्यामागे वाढत्या महागाईला तोंड देणे हे कारण सांगितले जात आहे. महागाई वाढली की चलनाचे मूल्य कमी होत असते तर सोन्याचे मूल्य वाढत असते. यासोबत अनिश्चिततेला तोंड देताना सुरक्षिततेसाठी म्हणूनदेखील सोन्याचा साठा करुन ठेवला जात असल्याची बाब समोर आली आहे.