पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर
डेहराडून / वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील चंपावत विधानसभा मतदारसंघात येत्या 31 मे रोजी पोटनिवडणूक होत असून मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना भाजपने उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा मुख्यमंत्री धामी यांना पराभूत करण्याची जबाबदारी भुवन कापरी यांच्यावर सोपवली आहे. चंपावत पोटनिवडणुकीत काँग्रेसने भुवन कापरी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कापरी यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते निवडणुकीची रणनीती तयार करण्यात व्यग्र आहेत. सध्या तरी काँग्रेसने उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. या निवडणुकीचा निकाल 3 जून रोजी जाहीर होणार आहे. 4 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवारांना 11 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
अलीकडेच उत्तराखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजयाची पुनरावृत्ती केली असली तरी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी खटिमा येथून पराभूत झाले होते. येथे काँग्रेसच्या भुवन कापरी यांनी त्यांचा जवळपास 6,000 मतांनी पराभव केला. तरीही धामी यांच्यावर विश्वास व्यक्त करत भाजपने धामी यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत टिकून राहण्यासाठी धामी यांना चंपावतमधून पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्यासाठी त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक आहे. असे असले तरीही येथेही त्यांचा मार्ग सोपा नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.