नवीन मुख्याधिकारी रोहित कदम यांनी बोलावलेल्या बैठकीत नगरसेवकांची मागणी : कामचुकार कर्मचारी, अधिकाऱयांवर नजर ठेवा
प्रतिनिधी /मडगाव
कामचुकार कर्मचारी तसेच अधिकाऱयांवर नजर ठेवण्याबरोबर पालिकेचा प्रशासकीय गाडा जाग्यावर घालण्याची मागणी मडगाव पालिकेच्या नगरसेवकांनी नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी रोहित कदम यांच्याकडे सोमवारी केली. मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच अन्य नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी मुख्याधिकाऱयांनी एक अनौपचारिक बैठक सोमवारी सायंकाळी बोलाविली होती. यावेळी बहुतेक नगरसेवकांनी पालिकेत कामचुकारपणा वाढला असून प्रशासकीय गाडा रूळावर आणण्याची मागणी केली असता कदम यांनी प्रशासन तसेच नगरसेवक यांच्यात समन्वय साधून लोकांची कामे सुरळीतपणे होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
प्रभाग 15 चे नगरसेवक महेश आमोणकर तसेच प्रभाग 18 चे नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी पालिकेकडे 200 हून अधिक रोजंदारीवरील कामगार असून ते योग्य प्रकारे काम करत नसल्याचे नजरेस आणून दिले. आमोणकर यांनी तर काही कामगार चक्क मोटारसायकल घेऊन भाडय़ाने फेऱया मारत असतात, असा दावा केला. मुख्याधिकाऱयांनी आपण असले प्रकार खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले. सर्व कामगारांना बोलवून घेऊन त्यांच्या कामाची माहिती घेऊन नियुक्ती करणार तसेच त्यांच्यावर देखरेख ठेवणार, असे यावेळी त्यांनी नगरसेवकांना सांगितले.
कंत्राटदार, आमजनता तसेच काही नगरसेवक पालिकेतील फायली स्वतः घेऊन फिरत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. असे प्रकार यापुढे चालणार नसून पालिकेचे शिपाई फायलींची ने-आण करू शकतात. पण मिळेल ते फायली घेऊन जातात, त्यामुळे त्या गहाळ होण्याचे प्रकार घडले असल्याचे यावेळी मुख्याधिकाऱयांच्या नजरेस आणून देण्यात आले. आपण यावर लक्ष ठेवणार, असे कदम यांनी सांगितले.
मुख्य सचिवांचा आदेश असल्याने आरोग्य नियमांखाली वीज वा पाणी जोडणीसाठी आपण कोणताही ना हरकत दाखला देणार नसल्याचे मुख्याधिकाऱयांनी यावेळी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले आहे. बेकायदा भंगार अड्डय़ांवर कारवाई होत नसल्याचे नगरसेवक आमोणकर यांनी नजरेस आणून दिले असता बेकायदा भंगारअड्डा असल्यास निश्चित कारवाई करू असे आश्वासन देताना बेकायदा बाबी आपण खपवून घेणार नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. नव्या मुख्याधिकाऱयांनी पदाचा ताबा घेतल्यानंतर नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बैठक बोलाविल्याबद्दल बहुतेक नगरसेवक तसेच नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी हा चांगला पायंडा असल्याचे म्हटले आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱयांसंदर्भात अहवाल सादर करण्याचा निर्देश
दरम्यान मडगाव पालिका क्षेत्रात खासदार निधीतून काही वर्षांपूर्वी बसविलेले सीसीटीव्ही कॅमरे योग्यरीत्या कार्य करत नसल्याने वाहतूक पोलीस विभागाने पालिकेने यात लक्ष घालून आवश्यक कृती करावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी पालिका मंडळाने या प्रस्तावावर चर्चा करून आवश्यक कृती करण्यास मंजुरी देण्यात आली होती. सोमवारी सकाळी नगराध्यक्ष पेरेरा, मुख्याधिकारी कदम, वाहतूक पोलीस अधिकारी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेल्या कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांच्या कक्षात बैठक झाली. यावेळी संबधित कंपनीला सध्या बसविण्यात आलेल्या 53 ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱयांची पाहणी करून त्यांच्यासंदर्भात अहवाल सादर करण्यास मुख्याधिकाऱयांनी सांगितले असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष पेरेरा यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. बहुतेक सीसीटीव्ही कॅमेऱयांतून चांगल्या प्रकारे चित्रण होत नसल्याच्या कैफियती असून ते बदलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मात्र अहवाल हाती आल्यावर चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती पेरेरा यांनी दिली.