झेलेंस्कींचा इशारा ः जगातील सर्व देशांनी तयार रहावे
युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान अनेक भागांमधून रशियाच्या सैनिकांनी माघार घेतली आहे. तर काही ठिकाणी पूर्वीपेक्षा अधिक भीषण हल्ले दिसून आले आहेत. आता या युद्धावर अण्वस्त्रांच्या वापराचा धोका घोंगावू लागला आहे. यासंबंधी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला आहे. जगातील सर्व देशांनी पुतीन हे युक्रेनच्या विरोधात अण्वस्त्रांचा वापर करू शकतात ही शक्यता विचारात घेत तयार रहावे असे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
पुतीन आण्विक किंवा रासायनिक अस्त्रांचा वापर करू शकतात. युक्रेनच्या लोकांच्या जीवनाला त्यांच्या लेखी कुठलेच महत्त्व नाही. अण्वस्त्रहल्ल्याची शक्यता खरी ठरू शकत असल्याने सर्व देशांनी चिंता करण्याची गरज आहे. आम्ही घाबरणार नसलो तरीही तयार राहणार आहोत असे झेलेंस्की म्हणाले.
पूर्ण जगासाठी प्रश्न
हा प्रश्न केवळ युक्रेनसाठी नव्हे तर पूर्ण जगासाठी उभा ठाकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 50 हून अधिक दिवसांच्या लढाईनंतरही युक्रेनची राजधानी कीव्ह अद्याप झेलेंस्की सरकारच्या नियंत्रणात आहे. तीव्र प्रतिकारामुळे युक्रेनमधील अनेक प्रमुख शहरे रशियाला बळकावता आलेली नाहीत. पुतीन या युद्धात कमजोर पडल्यास ते युक्रेनमध्ये अण्वस्त्रांचा वापर करू शकतात असा इशारा अमेरिकेच्या अधिकाऱयांनी दिला आहे.
सीआयएने केले सतर्क
सीआयएने अनेक शक्यतांचा बारकाईने विचार केला असल्याचे सीआयएचे संचालक बिल बर्न्स यांनी म्हटले आहे. काळय़ा समुद्रात रशियाची युद्धनौका मोस्कवा बुडाल्यावर जगात तिसरे महायुद्ध सुरू झाल्याची टिप्पणी रशियाच्या प्रसारमाध्यमाने केली होती. ही युद्धनौका बुडण्यासाठी पाश्चिमात्य देश जबाबदार असल्याचे प्रसारमाध्यमाचे म्हणणे आहे.