मॅक्रान यांच्यासोबतच्या चर्चेतील प्रकार ः युरोपमध्ये अण्वस्त्र हल्ल्याची भीती
वृत्तसंस्था / पॅरिस
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या आण्विक हल्ल्याचा उल्लेख केला आहे. युद्ध जिंकण्यासाठी कुठल्याही देशाच्या मुख्य शहरांवर हल्ला करण्याची गरज नसते याचे दुसरे महायुद्ध एक उदाहरण असल्याचे पुतीन यांनी चर्चेदरम्यान म्हटले आहे.
रशियाकडून एकीकडे खेरसॉनमध्ये वेस्टर्न बँकमधून हटविण्याचे आश्वासन दिले जात आहे, तर दुसरीकडे पुतीन यांनी फ्रान्सच्या अध्यक्षासोबतच्या चर्चेत जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या आण्विक हल्ल्याचा उल्लेख केला आहे. पुतीन यांनी आण्विक हल्ल्याचा उल्लेख केल्याने युरोपचे नेते घाबरले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यापासून जगभरात आण्विक युद्धाची भीती निर्माण झाली आहे. युक्रेनमध्ये सैन्यहल्ल्यांची तीव्रता वाढणे आणि आण्विक युद्धाच्या धोक्यादरम्यान युद्धग्रस्त देशाच्या नागरिकांसमोर हिवाळय़ाचे संकट उभे ठाकणार आहे.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा निर्णायक अंत करण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या पुतीन यांच्या संभाव्य निर्णयामुळे युरोपमध्ये भीतीचे वातावरण आहे. खेरसॉन शहरात किरणोत्सर्गी सामग्रीने युक्त बॉम्बचा वापर करण्याचा कट युक्रनने रचल्याचा आरोप रशियाने केला आहे. युक्रेनचे विदेशमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. तर रशिया अशाप्रकारच्या बिनबुडांच्या आरोपांद्वारे अण्वस्त्र हल्ल्यासाठी पार्श्वभूमी तयार करत असल्याचे अनेक जाणकारांचे मानणे आहे.