ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा ः त्रीशा जॉली-गायत्री गोपीचंद यांचा सातव्या मानांकितांना धक्का
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचे या मोसमातील खराब प्रदर्शन पुढे चालू राहिले असून येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत तिला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. महिला दुहेरी त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी मात्र थायलंडच्या सातव्या मानांकित जोडीवर सनसनाटी विजय मिळवित आगेकूच केली.
चीनच्या झँग यि मान हिच्याकडून तिला 17-21, 11-21 अशा सरळ गेम्सनी पराभव स्वीकारावा लागला. 39 मिनिटे हा सामना चालला होता. या वर्षात तिसऱयांदा ती पहिल्याच फेरीत पराभूत झाली आहे. जानेवारीत झालेल्या मलेशिया ओपनमध्ये तिला स्पेनच्या कॅरोलिन मारिनकडून तर त्याच महिन्यात झालेल्या इंडियन ओपन स्पर्धेतही ती पहिल्या फेरीत पराभूत झाली होती. तिने अलीकडेच कोरियन प्रशिक्षक पार्क तेई संग यांच्याशी फारकत घेतली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
या सामन्यात सिंधू सुस्तावलेली वाटत होती. याउलट जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर असणाऱया झँगने अधिक चपळता आणि आक्रमक इरादे दाखविले. या सामन्याआधी दोघींची दोनदा गाठ पडली होती आणि दोघीनीही एकेक सामना जिंकला होता. सिंधूने 6-5 आणि त्यानंतर 16-13 अशी आघाडी घेतली होती. पण झँगने सलग सात गुण घेत 20-16 अशी मजल मारली आणि लगेचच गेमही जिंकला. दुसऱया गेममध्ये दोघींनी 5-5 अशी बरोबरी साधली होती. पण सिंधूकडून काही अनियंत्रित चुका झाल्याने ती 5-10 अशी पिछाडीवर पडली. त्यातून ती 7-11 अशी सावरली. पण झँगने आधी 16-9 अशी आघाडी घेतली आणि नंतर हा गेमही जिंकून दुसरी फेरी गाठली.


जॉली-गायत्रीचा मानांकितांना धक्का
तत्पूर्वी, महिलांच्या दुहेरीत त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी थायलंडच्या सातव्या मानांकित जोडीला पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली. जॉली-गायत्री यांनी के.जाँगकोल्फन व रविंदा प्रजाँगजय यांच्यावर 46 मिनिटांच्या खेळात 21-18, 21-14 अशी मात केली. त्यांची पुढील लढत जपानच्या युकी फुकुशिमा व सायाका हिरोटा यांच्याशी होणार आहे. मंगळवारी लक्ष्य सेन व एचएस प्रणॉय यांनी पुरुष एकेरीत विजय मिळवून दुसरी फेरी गाठली होती.