बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप : सायना नेहवाल, के.श्रीकांत यांचे आव्हान समाप्त, जपानच्या यामागुचीचा विजयासाठी संघर्ष
वृत्तसंस्था /मनिला, फिलिपाईन्स
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र किदाम्बी श्रीकांत, सायना नेहवाल यांचे आव्हान संपुष्टात आले. जपानची अग्रमानांकित अकाने यामागुची मात्र थोडक्यात बचावली असून संघर्षानंतर तिनेही आगेकूच केली आहे.
चौथे मानांकन मिळालेल्या सिंधूने सिंगापूरच्या जसलीन हुईवर 21-16, 21-16 असा केवळ 42 मिनिटांत विजय मिळविला असला तरी जसलीनने तिला बराच काळ प्रतिकार केला. तिची उपांत्यपूर्व लढत तिसऱया मानांकित चीनच्या हे बिंग जाओ हिच्याशी होणार आहे. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत बिंग जाओवर विजय मिळविला होता. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱया सिंधूचे बिंग जाओविरुद्ध 7-9 असे रेकॉर्ड आहे. शेवटच्या दोन लढतीत सिंधूने तिला हरविले आहे. सिंधूने 2014 मध्ये गिमेचॉन येथे झालेल्या या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.
पुरुष दुहेरीत तिसऱया मानांकित सात्विक व चिराग यांनी शानदार प्रदर्शन करीत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना जपानच्या अकिरा कोगा व तायची सायतो यांच्यावर 21-17, 21-15 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असणाऱया भारतीय जोडीची पुढील लढत मलेशियाच्या पाचव्या मानांकित ऍरोन चिया व सोह वुइ यिक किंवा सिंगापूरच्या डॅनी बावा ख्रिसनान्ता व जुन लियान अँडी क्वेक यापैकी एका जोडीशी होईल.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चौथ्यांदा पदक जिंकण्याचे सायना नेहवालचे स्वप्न मात्र अधुरे राहिले. जागतिक क्रमवारीत 16 व्या स्थानावर असणाऱया चीनच्या 22 वर्षीय वांग झी यि हिच्याकडून सायनाला 21-12, 7-21, 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला. पुरुष एकेरीत सातवे मानांकन मिळालेल्या भारताच्या के.श्रीकांतचे आव्हानही दुसऱया फेरीत संपुष्टात आले. त्याला चीनच्या वेंग हाँग यांगकडून संघर्षपूर्ण लढतीत 16-21, 21-17, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. सुमारे सव्वातास ही लढत रंगली होती.
यामागुचीचा विजयासाठी संघर्ष
जपानचा अग्रमानांकित केन्टो मोमोटाला या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्याचीच देशवासी यामागुची दुसऱया फेरीच्या लढतीत पराभूत होण्यापासून थोडक्यात बचावली. जागतिक क्रमवारीत 317 व्या स्थानावर असणाऱया पात्रता फेरीतून आलेल्या कोमांग अयु काहया देवी हिच्यावर अतिशय संघर्षानंतर यामागुचीने विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. इंडोनेशियाच्या देवीने पहिला गेम 23-21 असा घेत आघाडी घेतली होती. पण विद्यमान चॅम्पियन यामागुचीने नंतरचे दोन गेम 21-9, 21-19 असे घेत आगेकूच केली. 46 मिनिटांत तिने हा सामना संपवला. तिची पुढील लढत थायलंडच्या सहाव्या मानांकित पॉर्नपोवी चोचुवाँगशी होणार आहे. अन्य एका लढतीत दुसऱया मानांकित ऍन सेयुंगने चीनच्या झँग यिमानवर 21-7, 21-19 असा सहज विजय मिळवित आगेकूच केली. पुरुष एकेरीत विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन सहावा मानांकित लोह कीन यू याने जपानच्या कोकी वाटानबेचा 21-16, 21-6 असा पराभव केला. जोनातन ख्रिस्तीशी त्याची पुढील लढत होईल.