ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सिंगापूर ओपन 2022 या स्पर्धेतील बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूने चीनच्या वांग झि यि हीचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केला. या कामगिरीसह पी व्ही सिंधूने आपल्या कारकिर्दीतील पहिले सिंगापूर ओपनचे सुपर 500 हे विजेतेपद पटकावलं.
सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित पीव्ही सिंधूनं वांगविरुद्ध पहिला सेट एकतर्फी जिंकला. त्यानंतर दुसरा सेट जिंकून वांगनं पुनरागमन केलं. मात्र, अखेरच्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं बाजी मारली. सिंगापूर ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूनं जपानच्या सेईना कावाकामीविरुद्ध एकहाती विजय मिळवला. चायनीज तैपेईच्या अग्रमानांकित ताय झू यिंगनं दुसऱ्या फेरीत माघार घेतल्यानं कावाकामीला पुढं चाल देण्यात आली होती. सिंधूनं कावाकामीविरुद्धच्या याआधीच्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवले. 2018 च्या ओपन स्पर्धेत सिंधूचा तिच्याशी अखेरचा सामना झाला होता. या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
हेही वाचा : खरंच ठाकरे-शिंदे एकत्र येणार?; संजय राऊत म्हणाले…